शिंदे गटाकडून महिलांचा अनादर

लाडकी बहिण योजना निव्वळ देखावा; महिला पदाधिकार्‍यांकडून वाभाडे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील शेडसई येथील माजी सरपंच प्रिया कडू यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून काढण्यात आले. परंतु त्यांनी काय पक्षविरोधी कारवाई केली हे सिध्द करण्यास जिल्हा प्रमुख राजा केणी अपयशी ठरले. अशातच कडू यांनी आपली बाजू मांडत शिंदे गटाचे वाभाडे काढले. त्यामुळे शिंदे गटात महिलांचा कायमच अनादर केला जात असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. एका बाजूला लाडकी बहिण योजना राबवून महिलांचा सन्मान करीत असल्याचा दिखावा शिंदे सरकार करीत आहे, तर दुसर्‍या बाजूला पक्षातील एका महिलेवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे आमदारांसह शिंदे गटातील राजा केणीवर नाराजी सुर उमटत आहेत.

रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रिया कडू यांना शिंदे गटातील राजा केणी यांच्याकडून 23 ऑक्टोबर रोजी पत्र आले. पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षातून काढण्यात आल्याचे लेखी पत्र त्यांना पाठविण्यात आले. पक्षाच्याविरोधात कोणतीही कामे केली नसतानाही तसेच एका महिलेचे मत ऐकून न घेता कडू यांच्याविरोधात केलेल्या कारवाईबाबत त्यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे. तालुका प्रमुख महेश शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाई केली, त्यांच्याविरोधात कोणतीही भुमिका घेतली नाही. मात्र मी पक्षाविरोधात कोणतेही काम केले नसतानाही महिला म्हणून माझ्यावर अन्याय केला आहे.

शिंदे व अन्य आमदारांनी बंडखोरी करीत भाजपसोबत राहून नवीन सरकार स्थापन केले. त्यानंतर झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना कुठेही स्थान देण्यात आले नव्हते. यावरुन शिंदे गटाने कायमच महिलांबाबत दुजाभाव केला असल्याचे पहायला मिळते. तर गोगावले यांनी तत्कालिन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याबाबतही अपशब्द वापरले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महिलांचा अनादर करणार्‍या शिंदे सरकारला महिला योग्य ती जागा दाखवतील, असा इशारा सर्वसामान्य महिलांकडून देण्यात आला आहे. रोहा तालुक्यातील शेडसई येथील शिंदे गटातील एका महिला माहिती नसतानाही त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून हकालपट्टी केली. त्यामुळे महिला सबळीकरण व सक्षमीकरणाच्या बाता बारणार्‍या शिंदे गटातील महिलांबद्दल असलेली दुटप्पी भुमिका स्पष्ट होऊ लागली आहे. 

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना राबविली. महिला सक्षमीकरण करण्यासाठी विविध योजना राबविल्या. मात्र पक्षातील महिलेवरच अन्याय केला. ही शोकांतिका आहे. कोणत्या कारणामुळे पक्षाने कारवाई केली? तसेच शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी केवळ बदनामी केली आहे. याबाबतचा उलगडा व्हायला हवा.

प्रिया कडू,
माजी सरपंच शेडसई
Exit mobile version