सायकलवाल्या ताईंमुळे पायपीट थांबेल; सीएफटीआयच्या सायकल वाटप कार्यक्रमात सावित्रींची प्रतिक्रिया

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

सीएफटीआयच्या विश्‍वस्त चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून सीएफटीआय आणि यूटीआयतर्फे अलिबाग, रेवदंडा आणि रोहा तालुक्यातील सावित्रींच्या लेकींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी सायकल मिळाल्यानंतर प्रत्येक मुलीच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. कृषीवलने त्यांच्याजवळ संवाद साधला असता घरापासून तीन-तीन, चार-चार किलोमीटर अंतरावर पायपीट करुन शाळेत जाणार्‍या सावित्रीच्या लेकींनी सायकलवाल्या ताई अर्थात चित्रलेखा पाटील यांना तोंडभरुन धन्यवाद देत ताईंमुळे आमच्या पायांना होणारा त्रास आता थांबणार असून, आम्हाला अभ्यासासाठीदेखील अधिक वेळ मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.


नागाव येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सायरस पुनावाला सीबीएसई स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सीएफटीआयच्या विश्‍वस्त चित्रलेखा पाटील यांच्यासह यूटीआयचे उपव्यवस्थापक दिनेश यादव, वरिष्ठ व्यवस्थापक दत्ताराम शेणवी, सीएफटीआयचे संचालक सुमेध खैरे, अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती सरोज वरसोलकर, रेवदंडा सरपंच मनिषा चुनेकर, आक्षी सरपंच रश्मी पाटील, ग्रा.पं. सदस्य करुणा म्हात्रे, रेवदंडा ग्रा.पं. सदस्य राजन वाडकर, संदीप खोत, संतोष मोरे, सुरेश खोत, निलेश खोत, खलील तांडेल, सलीम तांडेल,  संतोष टिवळेकर, मधुकर गायकवाड, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, शरद वरसोलकर, विजय वरसोलकर, एस.पी. ठाकूर, बाळू नवखारकर, पीएनपी सांबरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशिगंधा मयेकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात अलिबाग तालुक्यातील रेवदंडा, थेरोंडा, आगलेची वाडी, पालव परिसरातील सावित्रीच्या लेकींना सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

रोज शाळेत चालत जाताना पायांना त्रास होत होता. मात्र, आता शाळेत सायकलवरुन जाणार असल्याने लवकर पोहोचेन, पावसाळ्यातदेखील लवकर शाळेत जाता येईल. हे सगळे चित्रलेखाताईंमुळे शक्य झाले. त्यांच्यामुळे आमची पायपीट थांबली, कष्ट वाचले, त्यामुळे आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही.

देवश्री महेश ठाकूर, आगलेची वाडी, रेवदंडा

चित्रलेखाताईंनी सायकल दिल्याने खूप छान वाटत आहे. रोज शाळेत चालत जावे लागत असल्याने अधिक वेळ जात होता. मात्र, आता सायकलमुळे हा वेळ वाचून अभ्यास जास्त करता येईल.

विधी विलास कुणबी, थेरांडा-रेवदंडा

बोरघरवरुन तळाघर येथे तीन किलोमीटर चालत जाऊन शाळेत जात होते. त्यामुळे खूप पाय दुखायचे. मात्र, आता सायकलीमुळे त्रास कमी झाला असून, अभ्यासालादेखील जास्त वेळ मिळेल. चित्रलेखाताईंमुळे आमचा त्रास कमी होणार असल्याने त्यांना द्यावेत तितके धन्यवाद कमीच आहेत.

साक्षी रवींद्र माने, बोरघर, ता. रोहा

सायकल वाटपातून शाळा गळती रोखण्याचे काम- चित्रलेखा पाटील
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सीएफटीआयच्या विश्‍वस्त चित्रलेखा पाटील यांना सीएफटीआयच्या कामाचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील मुलींना दूरवर असलेल्या शाळेत पायी चालत जावे लागते, त्यामुळे शाळा गळतीचे प्रमाण चिंताजनक होेते. त्यावर मात करण्यासाठी सीएफटीआयने राबविलेल्या सावित्रीच्या लेकी उपक्रमाच्या माध्यमातून रायगडसह राज्यात आतापर्यंत 20 हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शिक्षण घेणार्‍या मुलींमध्ये उत्साह निर्माण होत शाळा गळतीचे प्रमाणदेखील कमी झाले असल्याचा विश्‍वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिक्षणासाठी मुलींना प्रोत्साहन देणार्‍या पालकांचेदेखील आवर्जून कौतुक करीत मुलींच्या शिक्षणसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली.


त्या पुढे म्हणाल्या की, सीएफटीआयचे संपूर्ण देशभरात काम सुरु असून, सर्वाधिक जास्त काम महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात जास्त गरज असल्याने होत आहे. शिक्षण, आरोग्य, आपत्तकालीन परिस्थिती, कोरोना काळात, लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. नेत्र तपासणी आणि चष्मे वाटपाचा उपक्रमदेखील यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. लाखो लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी यूटीआयचे उपव्यवस्थापक दिनेश यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चित्रलेखा पाटील आणि सीएफटीआयचे कौतुक केले. चित्रलेखा पाटील यांनी कंपनीला ही विशेष संधी निर्माण करुन दिल्याबद्दल त्यांनी धन्यवाददेखील दिले. तर वरिष्ठ व्यवस्थापक दत्ताराम शेणवी यांनी तीन-पाच किलोमीटर अंतर पार करुन शिक्षण घेणार्‍या मुलींना सततच्या प्रवासामुळे शारीरिक त्रास होऊन अभ्यासाला वेळ कमी मिळत असल्याने त्याचा शिक्षणावर परिणाम होत होता. सीएफटीआयच्या उपक्रमामुळे त्यांचा प्रवासातला वेळ वाचून त्यांना अभ्यासात अधिक लक्ष देण्यास वेळ मिळणार आहे. याचा लाभ घेऊन चांगले गुण मिळवून शाळेचे आणि आपल्या समाजाचे नाव मोठे करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सूत्रसंचालन सीएफटीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी शेकाप कार्यकर्त्यांसह सीएफटीआयच्या श्रेया केळकर, तन्वी पाटील यांच्यासह संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.

Exit mobile version