। पालघर । प्रतिनिधी ।
मिरा -भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाच्या अधिकारी आणि अंमलदार यांना पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.15) 20 बॉडीवॉर्न कॅमेर्यांचे वाटप करण्यात आले. पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलिसांना पुढील काही दिवसांत 200 बॉडीवॉर्न कॅमेर्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
आजच्या डिजिटल युगात वाहतूक पोलिसांना अधिक प्रभावीपणे आपले कर्तव्य बजावता यावे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यासाठी मिरा भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तलयातील वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना बॉडीवॉर्न कॅमेरा या उपकरणाचा वापर सुरु करण्यात आला आहे. बॉडी वॉर्न कॅमेरा ही एक वेअरेबल ऑडिओ व्हिडिओ किंवा फोटोग्राफिक रेकॉर्डिंग सिस्टम असून या उपकरणाच्या माध्यमातून वाहतूक पोलीस एकमेकांशी सहजपणे जोडले जाणार आहेत.