आदिवासी महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप

रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट आणि जनसंवाद संयुक्त उपक्रम

| महाड | वार्ताहर |

पर्यावरण पूरक कापडी पिशव्या ग्राहकांना देवून जनजागृती व्हावी या उद्देशाने महाड शहरातील रानमेवा विक्रेत्या आदिवासी महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

शहरांमध्ये जनजागृती करून देखील प्लास्टिक पिशव्यांचा वापर अद्याप थांबलेला नाही यामुळे प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे थांबली जात असून पर्यावरणास हानी पोहोचली जात आहे. यामुळे कापडी पिशव्यांबाबत जनजागृती बरोबरच त्या पिशव्यांचा वापर वाढला पाहिजे. या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट आणि जनसंवाद रुरल डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने महाड बाजारपेठेत ज्या आदिवासी महिला रानमेवा विक्री करण्यासाठी येतात त्यांना ग्राहकांना देण्यासाठी कापडी पिशव्यांचे प्रायोगिक तत्त्वावर वाटप करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महानगर परिषदेच्या प्रशासकीय भावनांमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट च्या प्रेसिडेंट सपना शेठ, सचिव मनीषा नगरकर, प्रकल्प प्रमुख जगदीश वर्तक, जनसंवाद संस्थेचे अध्यक्ष निलेश पवार, सचिव मिलिंद माने, उपाध्यक्ष चंद्रकांत कोकणे आदी पालिका अधिकारी आणि रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सपना शेठ यांनी प्लास्टिक पिशवीचे दुष्परिणाम आणि पर्यावरणास होणारी हानी याबाबत आपले विचार व्यक्त करून कापडी पिशवी देण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. तर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी प्लास्टिक पिशव्या पर्यावरणास धोकादायक असून विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देण्यापेक्षा कापडी पिशव्यांचा आग्रह केला पाहिजे असे सांगून नागरिकांनी देखील या उपक्रमात सहकार्य केले पाहिजे असे सांगितले.

Exit mobile version