। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील चावणे येथील कोकुयो कॅमलीन कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सवणे व चावणे परिसरापासून काही अंतरावर असलेल्या दुर्गंम भागातील पाच राजिप शाळांतील गरीब व गरजू अशा एकूण 95 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, भेटवस्तू तथा खाऊचे वाटप करण्यात आले.
हे वाटप कोकुयो कंपनीचे कंपनी मॅनेजर दिपक कापसे, एच आर प्रमुख गणेश आहेर, अॅडमिन प्रमुख सतिष कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राजिप शाळांतील उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार देवून सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कोकुयो कंपनीचे कंपनी मॅनेजर दिपक कापसे म्हणाले की, दिड वर्षांच्या टाळेबंदीमुळे शाळा आणि विद्यार्थी यात दुरावा निर्माण झाला आहे.
तो दूर करण्यासाठी कोकुयो कॅमलीन कंपनीने या कार्यक्रमाचे नियोजन केेले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, महिला सशक्तीकरण, बाळविकास व आरोग्य, सांस्कृतिक उपक्रम आदींवर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. कॅमलीन कंपनीचे उत्पादन साहित्य शालेय वस्तूंचे असल्याने 95 विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तू कंपनी कशी उत्पादित करते, यावर मार्गदर्शन करुन कंपनी परिसर दाखविण्यात आला. शाळेत वापरत असणार्या वस्तू कशा तयार होतात, हे प्रत्यक्षात पाहून त्याची माहिती विद्यार्थ्यांना झाली.