। आगरदांडा । वार्ताहर ।
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा येथील राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन शिक्षण विस्तार विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्यामार्फत नुकतेच शीघ्रे (आदिवासी वाडी) येथे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त आदिवासींना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले.
दिवाळी हा सण वर्षातील महत्वाचा सण असतो. मात्र, अनेकांना आर्थिक अडचण असल्याने हा सण उत्साहात साजरा करता येत नाही, याचे भान ठेऊन व आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक यांनी नवीन, वापरात नसलेले कपडे तसेच खाऊ जमा करून महाविद्यालयाच्यावतीने त्याचे शिघ्रे आदिवासी वाडी येथे वाटप केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.फिरोज शेख, प्रा. अल्ताफ फकीर, प्रा. जावेद खान, प्रा. निदा गोरमे आणि विद्यार्थ्यांमध्ये हुमेरा घारे, सना कारभारी, रोज्मीन कासकर, रुकय्या शिघ्रेकर, तयाबा कडू इ. यांनी मेहनत घेतली. या उपक्रमासाठी आदिवासी वाडीचे प्रमुख गुलाब वाघमारे आणि समीर वाघमारे यांचे सहकार्य लाभले.