| उरण | वार्ताहर |
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी विंधणे आदिवासी वाडी येथील कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी वाडीवरील 130 महिलांना साड्या वाटप करण्यात आले. तसेच 125 पुरुषांना टॉवेल, 70 मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरी तयार केलेला दिवाळीचा फराळ देखील आदिवासी बांधवाना देत त्यांचे तोंड गोड केले.
प्रा.के. ए. शामा यांच्या संकल्पनेतून गेली एकवीस वर्ष महाविद्यालय आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत आहे. आदिवासी बांधवांनाही हा सण आनंदाने साजरा करता यावा या उद्देशाने महाविद्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एन. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये गरीब समाजाप्रती आत्मियता वाढावी व त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. यावेळी रमेश ठाकूर (महाविद्यालय विकास समितीचे सदस्य) उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आर्थिक मदत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे, आयक्युएसी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, सुरज म्हात्रे (टाकीगाव) महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.