गोदी कामगार वेतनकराराचा प्रश्‍न सुटेल – जलोटा

| मुंबई | प्रतिनिधी |

भारतातील बंदर व गोदी कामगारांना 1 जानेवारी 2017 पासून नवीन वेतन करार लागू होत आहे, द्विपक्षीय वेतन समितीची चांगली प्रगती असून, या समितीच्या आत्तापर्यंत चार मिटिंग झाल्या आहेत . दोन ते तीन महिन्यांमध्ये वेतन कराराचा प्रश्‍न निकालात काढू, असे आश्‍वासन मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी जाहीर सभेत दिले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने युनियनचा शतकपूर्ती कौटुंबिक सोहळा, हिंद मजूर सभेचा अमृत महोत्सव, डॉ. शांती पटेल यांचा शतक महोत्सव असे औचित्य साधून डॉ. शांती पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त परेल येथील दामोदर हॉलमध्ये युनियनचा ऐतिहासिक शतकपूर्ती सोहळा ज्येष्ठ कामगार नेते ड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न झाला. याप्रसंगी राजीव जलोटा बोलत होते. यावेळी हरभजनसिंग सिद्धू, अ‍ॅड. एस. के. शेट्ये यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्याधर राणे, दत्ता खेसे यांनी केले तर आभार विजय रणदिवे यांनी मानले. याप्रसंगी संतोष कोयंडे दिग्दर्शित व गजेंद्र हिरे लिखित कर भला सो हो भला ही लघुनाटिका सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून दाखविण्यात आली. सुरुवातीला दीप प्रज्वलन झाल्यानंतर गणेश स्तवन, मंगळागौर, पोवाडा व दिंडी असे सांस्कृतिक कार्यक्रम दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश घाडी यांनी केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version