। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे शहरातील सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ भीषण अपघात झाला. एका कारचालकाने 12 जणांना धडक दिली. हे बाराही जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना शनिवारी दि. 31मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेतील जखमींना पुण्यातील संचेती व मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी कार चालकासह त्याचा सहकारी आणि कार मालकाला अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये एमपीएससीचे काही विद्यार्थी एका चहाच्या टपरीवर चहासाठी एकत्रित जमले होते. त्याचवेळी एका भरधाव वेगात येणाऱ्या कारने या बारा विद्यार्थ्यांना उडवले. या अपघात 9 जण जखमी झाले आहेत. या घटनेतील काही जखमींना स्थानिकांच्या मदतीने संचेती तर काही जणांना मोडक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताच्यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चालक जयराम शिवाजी मुळे(27), कारमालक दिगंबर माधव शिंदे, तर जयरामसोबत असणारा त्याचा सहकारी राहुल गोसावी याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.