अमेरिका, थायलंड, दूबई, मॉरिशिस अशा अनेक देशांकडून मागणी
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
गणरायाचे घरोघरी आगमन होण्यासाठी अवघे 87 दिवस शिल्लक राहिले आहेत. गणेशमुर्तीचे माहेर घर असलेल्या पेणमधील आकर्षक व सुंदर गणेशमूर्तींना विदेशात मागणी आली आहे. त्यामध्ये पीओपी 30 टक्के आणि शाडूच्या मातीच्या 70 टक्के मुर्तींचा समावेश आहे. अमेरिका, थायलंड, दूबई, मॉरिशिस अशा अनेक देशांकडून तीस हजारहून अधिक मूर्ती रवाना करण्यात आल्या असून 15 जूनपर्यंत या देशांमध्ये मूर्ती पोहचतील असे मूर्तिकारांनी सांगितले आहे.
गणरायाचे आगमन यंदा 27 ऑगस्टला होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा पंधरा दिवस अगोदर गणराया घरोघरी येणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेणसह अन्य ठिकाणी गणेशमुर्ती तयार करण्याबरोबरच पॉलिश करणे, सोनेरी रंग लावणे, फिनीशींग करणे, रंगकाम करणे अशा अनेक प्रकारची कामे कारखान्यांमधून सुरू झाली आहेत. पेणमध्ये पाच हजारहून अधिल लहान मोेठे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये मूर्ती तयार करण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत पीओपी मुर्तीसाठी 60 टक्के माल तयार असून 40 टक्के मूर्ती रंगून तयार आहेत. मात्र, व्यापार्यांकडून राज्यात मागणी नसल्याने मूर्तिकार चिंताग्रस्त झाले आहेत.
मात्र, विदेशात पेणच्या गणेश मुर्तींना मागणी आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मूर्ती पाठविण्यास सुरुवात झाली होती. आतापर्यंत 30 हजार मूर्ती तयार होऊन विदेशातदेखील पाठविण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेने यंदा गणेशमुर्तींच्या किंमतीमध्ये 15 टक्केने वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या कच्च्या मालाचे भाव, कामगारांची वाढती मजूरीमुळे हे दर वाढणार आहे. दीड फुटाच्यामुर्ती मागे एक हजार दोनशे ते दीड हजार रुपये ग्राहकांना खर्च करावे लागणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
पीओपीच्या मूर्ती भरपूर आहेत. मालही तयार आहे. मातीच्या मुर्तीचा माल जास्त तयार नाही. त्या बनविण्यासाठी भरपूर कालावधी लागणार आहे. त्यामुळे या मूर्ती जास्त बनवू शकत नाही. यावर्षी मुर्तीच्या किंमती 15 टक्केने वाढणार आहेत. विदेशात मुर्तीला मागणी आली असून 30 हजार मूर्ती पाठविण्यात आल्या आहेत.
– दिपक समेळ, मूर्तिकार