। अलिबाग । प्रमोद जाधव ।
अपुर्या मनुष्यबळामुळे बंद्यावर लक्ष ठेवणे तारेवरची कसरत असते. परंतु, जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेबरोबरच बंद्याच्या संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा कारागृहाने आता सीसीटीव्ही कॅमेरांची मदत घेतली आहे. जिल्हा कारागृहात प्रवेशद्वारापासून सर्वच ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्याचा प्रयत्न कारागृह प्रशासनाने केला आहे.
अलिबागमधील जिल्हा कारागृह हे दगडी बांधकामाचे आहे. 82 कैद्यांची क्षमता असलेले हे कारागृह आहे. मात्र वाढत्या गुन्हेगारीमुळे कैदयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा भार कारागृहावर पडत आहे. सध्या जिल्हा कारागृहात 202 कैदी आहेत. खून, चोरी अशा अनेक गुन्ह्यांतील कैदी या कारागृहात आहेत. जिल्हा कारागृहात जिल्हा कारागृह अधीक्षकांसह तुरूंग अधिकारी, कर्मचारी यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांवर लक्ष ठेवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कारागृहात वेगवेगळे उपक्रम राबवून कैद्यांना माणूस म्हणून घडविण्याचे काम जिल्हा कारागृह प्रशासनाकडून कायमच केले जात आहे. वेगवेगळ्या परीक्षा, स्पर्धा घेणे, कौशल्य विकास अंतर्गत रोजगाराचे साधन खुले करण अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून कैद्यांना घडविण्याचे काम कारागृह प्रशासन करीत आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी कारागृहातून उडी मारून पळून गेले होते. तर काही कैद्दी पसार झाले होते. त्या कैद्यांना शोधण्यात आले. परंतु, अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून जिल्हा कारागृह प्रशासनाने कारागृहाच्या सुरक्षेसाठी तसेच कैद्यांच्या प्रत्येक संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी मागणी केली होती. या मागणीची दखल जिल्हा प्रशासनाने घेत निधीची तरतूद केली. त्यानुसार शंभर सीसीटीव्ही कॅमेरे कारागृहात बसविण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरांमुळे कारागृहातील सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जिल्हा कारागृहातील सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने कारागृहातील प्रत्येक संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे.
– अशोक कारकर, जिल्हा कारागृह अधीक्षक, रायगड