| पनवेल | प्रतिनिधी |
उलवे भागात राहणार्या सुरेंद्र आसाराम पांडे (43) या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात उलवे पोलिसांनी एप्रिल महिन्यात अटक केलेल्या विशाल संजय शिंदे (21) या आरोपीने त्याच्यासोबत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध केल्याचे आणि त्यामुळे सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे उलवे पोलिसांनी विशाल शिंदे याच्याविरोधात आता बलात्कारासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आरोपी विशाल शिंदे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
संगमनेर येथे राहणारा आरोपी विशाल शिंदे याची काही महिन्यापूर्वी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इन्टाग्रामवरुन ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री होऊन त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरु झाले होते. या कालावधीत विशाल शिंदे याने या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत नाशिक येथील लॉजवर, संगमनेर येथील नागापूर एमआयडीसी येथे भाड्याच्या खोलीत तिच्यासोबत शरीरसंबंध केले होते. मार्च महिन्यात सदर अल्पवयीन मुलगी नवी मुंबईत नोकरीच्या शोधात आली असताना तिची उलवे, सेक्टर-24 मध्ये राहणार्या मृत सुरेंद्र पांडे याच्या सोबत ओळख झाली होती. त्यानंतर पांडे याने अल्पवयीन मुलीला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन तिला आपल्या घरामध्ये राहण्यास अनुमती दिली होती. यादरम्यान या अल्पवयीन मुलीने आपला प्रियकर विशाल शिंदे याला उलवे येथे बोलावून घेतले होते. याच कालावधीत सुरेंद्र पांडे याने सदर अल्पवयीन प्रेयसीकडे शरीरसुखाची मागणी केल्यामुळे विशाल आणि पांडे यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर 2 एप्रिल रोजी विशाल शिंदे आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीने सुरेंद्र पांडे याच्या डोक्यामध्ये हातोडीने हल्ला करुन त्याची हत्या केली होती. त्यानंतर या दोघांनी पांडे याचा मृतदेह चादरीत बांधून त्याच्या घराला बाहेरुन टाळे लावून वॅगनार कार घेऊन पळ काढला होता. त्यानंतर दोघे संगमनेर येथे गेल्यानंतर त्यांनी विशालच्या कुटुंबियांना घडल्या प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर विशालच्या घरच्यांनी त्यांना पोलिसांत हजर होण्याचा सल्ला दिल्यानंतर ते स्वतः संगमनेर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर उलवे पोलिसांनी संगमनेर येथे जाऊन विशाल आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीला ताब्यात घेतले होते.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात विशालची प्रेयसी अल्पवयीन असल्याचे तसेच ती गरोदर असल्याचे तपासात आढळून आले आहे. सदर मुलगी अल्पवयीन असताना विशालने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सदर मुलगी गरोदर राहिल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोपी विशाल विरोधात हत्या प्रकरणापाठोपाठ बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी पाटील यांनी दिली. सध्या आरोपी विशाल पाटील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे तसेच त्याची अल्पवयीन प्रेयसी रुग्णालयात दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.