शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
| अलिबाग | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील मांडला परिसरात ट्रायकोन कंपनीच्या मनमानी आणि मुजोर कारभाराने स्थानिक शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून, या गंभीर प्रकारामुळे पर्यावरणाचे संतुलनही बिघडले आहे. कंपनीने मांडला येथील डोंगर जेसीबी आणि पोकलेन यंत्रांच्या साह्याने अक्षरशः पोखरून काढला आहे. या डोंगरखोदीमुळे आणि नैसर्गिक नदी-नाल्यांच्या प्रवाहामध्ये माती व दगड टाकून सपाटीकरणाच्या नावाखाली ते बुजवून टाकल्याने डोंगराखालील शेतकरी मोठ्या नुकसानीचा सामना करत आहेत.
25, 26, 27 आणि 28 मे रोजी मांडला परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. डोंगरात खोदलेली आणि भुसभुशीत झालेली माती पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाहून खाली पायथ्याशी आली. याचा थेट फटका कैलास पिंगळे आणि भोईर यांच्या बागेला बसला आहे. कैलास पिंगळे यांच्या बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यांच्या बागेतील घरात पाणी आणि चिखल साचला आहे. ही परिस्थिती माळीणसारख्या दुर्घटनेची आठवण करून देणारी आहे. त्यांचे घर कोसळण्याच्या अवस्थेत असून, बागेतील आंब्याची आणि सागाची झाडे मोडून पडली आहेत. विशेष म्हणजे, बोअरवेल मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली असून, पाण्याची मोटार पाण्यात गेल्याने निकामी झाली आहे. घराभोवती दोन फुटांपर्यंत मातीचा ढिगारा साचल्याने कैलास पिंगळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या गंभीर नुकसानीनंतरही ट्रायकोन कंपनीचे कर्मचारी कोणतीही दयामाया न दाखवता हात झटकून मोकळे होत असल्याचा आरोप कैलास पिंगळे यांनी केला असून, त्यांनी तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. आता ते महसूल विभागाकडून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
कंपनीने खोदलेली माती मांडला ते बेलवाडी या रस्त्यावर आल्याने तो रस्ता अत्यंत निसरडा झाला असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. केवळ मनुष्यजीवनच नाही, तर जंगलातील सजीवांनाही या मनमानी कारभाराचा फटका बसला आहे. रानपाखरांचा विसावा नष्ट झाला असून, अनेक पशू डोंगर सोडून गावाकडे वस्तीवर येऊ लागले आहेत. ट्रायकोन कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे पर्यावरणाचे संतुलन पूर्णतः बिघडले आहे. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत.