छुप्यागीरीने मासेमारी करणार्यांवर कडक कारवाईचे आदेश
| चिरनेर | प्रतिनिधी |
राज्य शासनाच्या आदेशानुसार 1 जून ते 31 जुलै 2025 पर्यंत या दोन महिन्यांच्या कालावधीत मासळीचा प्रजननकाळ असल्याने खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाने तशा प्रकारे आदेश दिले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणार्या मच्छिमारांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे उरण मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी सुरेश बावुलगावे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमनअधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश 2021 अन्वेय्य यंदाच्या वर्षी दि.1 जून ते 31 जुलैपर्यंत 61 दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्र संचालित व यांत्रिकी मासेमारी नौकांना करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्र संचालित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी केले आहे.
बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करून मासेमारी केल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी सांगितले.राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यंत्र चलित व यांत्रिकी मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तरी सर्व मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौका मालक, सभासद व अन्य संबंधितांनी बंदी कालावधीत समुद्रात मासळी अधिक प्रमाणात निर्माण व्हावी, यासाठी 1 जून ते 31 जुलै मासळीच्या प्रजनन कालावधीत यंत्र संचालित व यांत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
1 जूनपासून 31 जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारी बंदीचे देण्यात आले असून, पावसाळ्यातील बंदी काळात मासेमारी करतांना व बंदर किंवा अन्य कोणत्याही खाडीकिनारी छुप्यागिरीने मासळी उतरवणार्या बोटीवर कडक करण्यात येईल.
– सुरेश बावूलगावे, परवाना अधिकारी
मत्स्यव्यवसाय विभाग, उरण