सव्वा किलोमीटर लांबीच रस्ता तयार, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील वन जमिनीवर वसलेल्या बेकरेवाडी येथील रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे माथेरानच्या डोंगरात असलेल्या वाड्यांमधील आदिवासी लोकांनी श्रमदान करून रस्ते बनवले आहेत. मात्र रस्त्यांची अवस्था पावसाच्या पाण्यामुळे दयनीय झाली आहे. दरम्यान,पावसाचा जोर कमी झाला असता स्थानिक आदिवासी लोकांनी पुन्हा एकदा श्रमदान करण्यास आहे.
माथेरानच्या डोंगरात 12 आदिवासी वाड्या असून त्यातील आसलवाडी पर्यंत जाण्यासाठी नेरळ माथेरान घाटरस्त्यातून जुम्मापट्टी येथून जाता येते. त्या भागातील सर्व आदिवासी वाडया 100 वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत. मात्र वन कायदा अस्तित्वात आला आणि त्या ठिकाणच्या वाड्यांची जामनी वन विभागाच्या मालकीची झाली. वन जमिनीवर वसलेल्या या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते बनविले जात नाहीत. त्यामुळे या भागातील सर्व आदिवासी लोक यांनी एकत्र येत श्रमदान करून स्वतःच्या वाडीत जाणारे रस्ते बनवून घेतले. ते सर्व रस्ते पक्के नसल्याने पावसाळ्यात पाण्यासोबत वाहून जात असतात. त्यामुळे दरवर्षी या रस्त्यांची दुरुस्ती स्थानिक आदिवासी लोकांना करावी लागते. यावर्षी पावसाने थैमान मांडले असून जुम्मापट्टी धनगरवाडापासून बेकरेवाडी पर्यंतचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे साधी सायकल जाण्यासाठी देखील रस्ता शिल्लक राहिला नाही.
मातीचा बनवलेला रस्ता वाहून गेल्याने स्थानिक आदिवासी लोकांनी गेली चार दिवसापासून श्रमदान करण्यास सुरुवात केली आहे. गोविंद पारधी, वाळकु पारधी, बुधाजी निरगुडे, गजानन पारधी, कैलास निरगुडे यांच्या पुढाकाराने स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी रस्त्यासाठी श्रमदान करण्यास सुरुवात केली आहे. साधारण सव्वा किलोमीटर लांबीचा रस्ता स्थानिक आदिवासी लोकांनी श्रमदान करून तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तर या भागातील बहुसंख्य आदिवासी तरुण हे रोजगार मिळविण्यासाठी निमित्ताने माथेरान येथे किंवा नेरळ येथे जात असतात. त्यामुळे बेकरेवाडीमधील आदिवासी महिलांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी श्रमदान केले. शासनाकडून पक्क्या रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीचा अडथळा पुढे आणला जात आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी येथील आदिवासी लोकांनी श्रमदान करून वाडीमध्ये रास्ता नेला आणि नंतर पुढे सर्व आदिवासी ग्रामस्थांनी आपल्या आपल्या वाडी पर्यंत रस्ता नेण्याचे काम केले आहे.
माझी प्रकृती ठीक नसल्याने मला रस्त्यासाठी श्रमदान करता येत नाही. मात्र वैद्यकीय उपचारासाठी मुरबाड येथे जात असताना श्रमदान करणारे सहकारी पाहून माझ्या सहकार्यांचा मला अभिमान आहे.
जैतू पारधी, आदिवासी कार्यकर्ते