। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभेच्या जागेसाठी रात्रीचा दिवस करून कार्यकर्ते लढले. परंतु, अनपेक्षीतपणे पराभव स्विकारावा लागला. मात्र, पुन्हा एकदा मशाली पेटवून लढण्याची वेळ आली आहे. शेकाप संपला असे बोलणाऱ्यांनी मेळाव्यातील होणारी कार्यकर्त्यांची गर्दी बघा, असा टोला लगावत शेकापला संपविण्याचे स्वप्न पाहू नका, असा विरोधकांना सज्जड दम शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी त्यांच्या शैलीमध्ये दिला आहे. अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृह येथे मंगळवारी (दि.11) संपन्न झालेल्या शेकाप तालुका कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या.
ॲड. मानसी म्हात्रे यांनी पुढे सांगितले की, शेकापच्या संवाद मेळाव्यात आजची ही गर्दी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मांदीयाळी आहे. विरोधक कसे निवडणूक लढले हे पाच वर्षात जनतेला कळणार आहे. शेकापला संपविण्याचा अपप्रचार विरोधकांनी थांबवावा, अन्यथा आगामी काळात आपण संपलो हे बोलायची वेळ येईल, अशी घमघमीत टीका मानसी म्हात्रे यांनी केली. तसेच, शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात सुरेश खैरे यांच्या रुपाने एक वेगळे नेतृत्व मिळाले आहे. जिल्ह्यात पक्ष संघटनेमध्ये वेगळा बदल केला जाणार आहे. महिलांना घडवून एक वेगळी ताकद जिल्ह्या निर्माण करायचे आहे. प्रत्येक तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम केले जाणार आहे. अलिबाग तालुका एक मॉडेल ठरला पाहिजे. या पद्धतीने तालुका, जिल्हा स्तरावर काम केले जाणार आहे. एकनिष्ठ कार्यकर्ता पक्ष संघटनेवर घ्यायचा आहे. प्रकल्पाला विरोध नाही, परंतु स्थानिकांना त्यांचे स्थान, मुलभूत अधिकार मिळाले पाहिजे ही शेतकरी कामगार पक्षाची भुमिका आहे, असे ॲड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना शेकाप राज्य चिटणीस मंडळाचे खजीनदार अतुल म्हात्रे यांनी सांगीतले की, मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्ते व जनसामान्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. या मेळाव्याला कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. एक वेगळी उर्जा यातून प्राप्त झाली आहे. राज्यात राजकीय पक्षाची अवस्था काय आहे, हे सर्वांनाच माहित आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा देणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाची एक वेगळी ओळख आहे. आगामी काळात पक्ष संघटनेत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. यातूनच एक वेगळी उंची उद्या गाठता येणार आहे. तसेच, आगामी काळात पेण, उरण, अलिबाग, सुधागड, रोहा या भागात तिसरी मुंबई येणार आहे. जमीनी घेण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. अनेक गावे बाधीत होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या मुंबईत आपली सामाजिक बांधिलकीतून भूमिका काय असणार हे दाखवून देणे आवश्यक आहे. शेतकरी, विकासक आणि प्रबळ झाला पाहिजे या पध्दतीने काम करण्याची गरज आहे. येत्या काळात भूमीपुत्रांना न्याय देण्यासाठी काम करायचे आहे, असे देखील अतुल म्हात्रे म्हणाले आहेत.