। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तरीदेखील अनपेक्षित असे अपयश आले. परंतु, पुन्हा नवी उभारी घेऊन कार्यकर्ते कामाला लागले त्याचा आनंद आज या मेळाव्याच्या अफाट गर्दीतून दिसून येत आहे. शेतकरी कामगार पक्ष एक वेगळा विचार आहे. गोरगरीब, कष्टकरी, कामगार व शेतकऱ्यांसोबत बांधिलकी असणारा पक्ष आहे. आपल्या तत्त्वाशी कायम राहणार पक्ष आहे. येथील भूमीपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, या मातीतील माणसाची प्रगती झाली पाहिजे, अन्यथा प्रकल्प बंद करू. तसेच, सध्याची राजकीय परिस्थिती भयावह आहे. दलाल व चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. बाहेरील ठेकेदारांना ठेके देऊन टक्केवारी घेण्याचा प्रकार सुरु आहे. शेतकरी कामगार पक्षाने कधीही तत्त्वाशी तडजोड केली नाही, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले आहे. अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृह येथे मंगळवारी (दि.11) झालेल्या तालुका कार्यकर्ता संवाद मेळ्याव्यात त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, कार्यकर्ते, महिला व तरुणांनी रात्रीचा दिवस करून ही निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आतून गद्दारी असतानाही निष्ठावंत कार्यकर्ते ठाम उभे राहिले. चांगली मते या निवडणुकीत मिळाली. यातूनच शेकापच्या पाठीशी जनता असल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात एक वेगळ्या भूमिकेतून आपल्या सर्वांना काम करायचे आहे. पक्षाबद्दल गैरसमज निर्माण करीत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले सहकार निर्माण केले. अनेकांना नोकऱ्या दिल्या. भाईंच्या पाठीशी उभे राहून वेगळा संघर्ष उभा करायचा आहे. भूमीपुत्रांच्या पोटावर लाथ मारणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. शेकापची नाळ गोरगरीब, सामान्यांशी जुळलेली आहे. तालुक्याच्या विकासाठी, येथील भूमीपुत्रांच्या हितासाठी लढा देण्याचे काम केले जाणार आहे. आगामी काळात निवडणुका होणार आहेत. एकजूट होऊन त्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. पुढचा काळ हा शेकापचा असणार आहे. एक वेगळी क्रांती घडवून आणू, असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला आहे.