शेकाप कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्वातंत्रपुर्व काळापासून राज्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचे एक वेगळ वर्चस्व राहिले आहे. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्याशी शेकापची कायमच बांधिलकी राहिली आहे. जोपर्यंत अन्यायग्रस्त, पिडीत, कष्टकरी यांच्यासोबत आहोत, तोपर्यंत शेकापला काहीच कमी पडणार नाही. सरकारी कार्यालये दलालांचे अड्डे झाले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीनी विकत घेणाऱ्यांविरोधात लढायचे आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे या भूमिकेतूनच अधिक प्रबळ काम करण्याची आपली भूमिका राहणार आहे. शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहील, अशी ग्वाही शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली. शेतकरी कामगार पक्ष अलिबाग तालुका कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा मंगळवारी (दि.11) पीएनपी नाट्यगृह येथे घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, ॲड. गौतम पाटील, नंदकूमार मयेकर, संतोष जंगम आदी मान्यवरांसह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठे केले त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्या गद्दारांना ठेचण्याचे काम आपल्याला आगामी काळात करायचे आहे. एक वेगळ्या भूमिकेतून आपण काम करणार आहोत. पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ असणाऱ्यांनाच पक्षात चांगली जागा देण्याची भूमिका राहणार आहे. तरुणांच्या हाती पक्ष संघटना देण्याचा निर्णय असणार आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून कार्यकर्त्यामध्ये मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद हीच पक्षाची खरी ताकद आहे. मागील निवडणूकीत मिळालेल्या अपयशाबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चिड, संताप निर्माण झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे विचार तरुणापर्यंत रुजविण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागा. तसेच, जिल्ह्यात शेतकरी, महिला संघटना तयार करण्याबरोबरच युवकांची प्रभावीपणे आघाडी निर्माण करण्याचा मानस आहे. सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करायचे आहे. शेतकरी कामगार पक्षाकडे संपुर्ण महाराष्ट्र एक वेगळ्या आशेने पहात आहे. दादागिरी, सत्तेचा माज करून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उद्याचा विजय हा निश्चित आपलाचा असणार आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊः ॲड. गौतम पाटील
कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी लढा देण्याचे काम शेकापने केले आहे. शेकापची एक वेगळी ओळख राज्याच्या राजकारणात आहे. त्यामुळे पुन्हा आक्रमक होऊन शेकापची खरी ओळख दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. शेकापचे विचार तरुणांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. नवीन फळी तयार करून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ असा विश्वास ॲड. गौतम पाटील यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, अलिबागमध्ये शेकापच्या महिला आघाडीचे काम सक्षम आहे. आपल्या पक्षाला उभारी देण्याचे काम महिला आघाडी नक्की करेल. पेट्रोल, गॅसच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा आपल्याला लढा देण्याची गरज आहे. शेकाप विकासाला व प्रकल्पाला विरोध करतो, असा खोटा प्रचार विरोधक कायमच करीत आले आहेत. परंतु, पिकत्या जमीनी घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम होत आहे, याची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली जमीनी घेतल्या आहेत. मात्र, त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, याची सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे शेकापचे विचार तरुणापर्यंत पोहचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी केले आहे.
सुरेश खैरे, शेकाप जिल्हा चिटणीस
संवाद मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दाखविला आहे. प्रत्येक कार्यकर्ते उत्स्फुर्तपणे या मेळाव्यात सहभागी झाले. त्यामुळे शेकापसोबत एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, हे चित्र दौऱ्यातून स्पष्ट झाले. चित्रलेखा पाटील यांनी महिलांचे चांगले संघटन बांधले आहे. मागील निवडणूकीत पराभव झाला असला, तरी मताधिक्य चांगले मिळाले. पराभवाची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये घटक पक्षातील काही पक्षातून सहकार्य मिळाले नाही, हे एक कारण आहे. मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांमधील आकड्यांनी शेकापचे अस्तित्व दाखवून दिले आहे. पराभवामुळे खचून न जाता, चित्रलेखा पाटील व सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा उमेदीने कामाला लागून जनतेची सेवा करण्यास सुरुवात केली. अलिबागमध्ये पक्ष संघटनेत अमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न राहणार आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण स्तरानुसार पक्षाची बांधणी केली जाणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तरुणांसह ज्येष्ठांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागा .असे आवाहन सुरेश खैरे यांनी केले.