अरे बापरे! ताजी मच्छी कशी ओळखायची समजत नाहीय?…जाणून घ्या टिप्स आणि टाळा खराब मासळीचा धोका

अलिबाग । नेहा कवळे

अलिबागला फिरायला येताय… मग मच्छी खरेदी करणारच… अलिबाग व परिसरातील निसर्ग, ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. अलिबागला समुद्र किनारा लाभला असल्याने येथे येणारे खवय्ये मासळीचा स्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. परंतु मार्केटमध्ये गेल्यावर मासे खरेदी करताना आपल्या हाती शिळे किंवा खराब मासे मिळण्याचा धोका असतो. मासे ताजे असतील तरच जेवण चांगले चवदार होते, नाहीतर पैसे वाया घालवून काही उपयोग होत नाही. त्यासाठी ताजे किंवा चांगले मासे कसे ओळखावे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला प्रत्येकवेळी मासे खरेदी करताना उपयोगी पडेल. मासे खाणार्‍यामध्ये दोन प्रकार आहेत. खार्‍या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील. खार्‍या पाण्यातील ताजे मासे कसे ओळखावे हे जाणुन घेऊया.

ताजे मासे उत्पादने खरेदी करताना, सर्वप्रथम, त्याच्या गिल्स आणि डोळ्यांकडे लक्ष द्या. कोणत्याही ताज्या माशांचे डोळे अपरिहार्यपणे पारदर्शक आणि बाहेर पडलेले असले पाहिजेत आणि जर ते पोकळ आणि ढगाळ असतील तर तो मासा निश्‍चित शिळा असतो. तसेच माशांच्या गिल गुलाबी किंवा चमकदार लाल असाव्यात. बर्‍याचदा खराब मासे काही वेळा ताज्या माश्यांच्या ढिगात मिसळून विकले जातात. या प्रकारात कुजकट वास आणि मरगळलेले मासे ओळखणे केवळ सरावाने शक्य होते. यावेळी मासा ताजा नसेल तर बोटाने थोडासा दाब दिल्यावर तिथे खोलगट ठसा उमटतो. ताज्या माश्यात असे होत नाही. काही मासे काप पाडून विकले जातात. ताज्या माशांचे तुकडे दिसायला व्यवस्थित असतात व त्यावर पारदर्शक पांढर्‍या रंगाची झाक असते. तर आपण ताज्या माशाचे कल्ले थोडेसे उघडून पाहिल्यास आतमधून बर्‍यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतील. ते जर फिकट असले तर ताजेपणा संपलेला आहे. फसवण्यासाठी काही विक्रेते शिळ्या माशांचे कल्ले चक्क रंग लाऊन लाल करतात तरी त्यापासून सावध रहा.

पर्यटकांनो हे मासे खरेदी करताना घ्या काळजी

पापलेट

पापलेट
रंगाने पांढरी आणि चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालचा भाग दाबुन बघावा. त्यातुन सफेद पाणी आले तर ते ताजे असतात आणि लाल पाणी आल्यास ते शिळे असतात हे समजावे. तसेच पापलेट शिळी किंवा खराब होत आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.

सुरमई

सुरमई, रावस, हलवा
हे मासे विकत घेताना बोटांनी थोडे दाबुन घट्ट बघुन घ्यावेत. माशांचे तोंड उघडून बघुन आतमध्ये लालसर भाग दिसला तर ते मासे ताजे आहेत असे समजावे. काळसर दिसले तर ते शिळे किंवा खराब आहेत असे समजावे.

लाल कोळंबी

लाल कोळंबी
लाल कोळंबीमध्ये काळसर लाल व पांढरी हिरवट रंगाची लाल कोळंबी ताजी असते. ही कोळंबी रंगाने नारिंगी रंगाची होऊ लागल्यास ती शिळी किंवा खराब झाली असे समजावे. शिळ्या आणि खराब झालेल्या कोळंबीची डोकी तुटलेली असतात. ताजी कोळंबी घट्ट आणि कडक सालीची असते. खराब कोळंबीची साल मऊ पडलेली असते आणि तिला घाण वास येतो.

बांगडा

बांगडा
काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून बघितल्यास लालसर रंगाचे दिसणारे बांगडे ताजे असतात. शिळ्या व खराब बांगड्यांना पिवळसर रंग येऊ लागतो आणि ते मऊ पडतात. बोटांनी दाबल्यास खड्डा पडतो.

बोंबील

बोंबील
ताजे बोंबील पांढर्‍या स्वच्छ रंगाचे, घट्ट व चमकदार असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. बोंबील खराब व्हायला लागल्यास त्यांना पिवळसर रंग येतो.

मांदेली

मांदेली
पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट आणि तोंडातील भाग लाल असणारी मांदेली ताजी असते. मांदेली शिळी किंवा खराब होऊ लागल्यास तिला नारिंगी रंग येऊ लागतो आणि त्या मऊ पडतात.

शेवंडी

शेवंडी
शेवंडी विकत घेताना घट्ट आणि कडक सालीची बघुन घ्यावी.

कालवे

कालवे
कालवे घेताना पांढर्‍या रंगाची, मोठी आणि ताजी पाण्यात ठेवलेलीच घ्यावीत. छोटे कालवे साफ करायला त्यांच्यातील दगडांची बारीक कच काढताना त्रास होतो आणि कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात.

शिंपले

शिंपले
शिंपले घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात. जिवंत आणि तोंडाची उघडझाप करणार्‍या शिंपल्याही घेऊ शकता. खराब आणि शिळ्या झालेल्या शिंपल्यांची तोंडे उघडी असतात.

खेकडे

खेकडे
खेकडे घेताना काळसर रंगाचे, जिवंत आणि चालणारे बघुन घ्यावेत. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतून मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेली तर खेकडे आतून पोकळ असतात. अमावस्येला खेकडे मांसाने भरलेले असतात तर पौर्णिमेला खेकडे आतून पोकळ असतात.

गोड्या पाण्यातील मासे

गोड्या पाण्यातील मासे
नदीच्या किंवा तळ्यातील मासे असतील तर त्यांचे डोळे, कल्ले आणि पोटाकडचा भाग पाहुन घ्यावा. ताज्या माशांचे डोळे काळेशार असतात, त्यांचे कल्ले गुलाबी किंवा लाल असतात तर त्यांच्या पोटाकडील भाग पांढरा आणि थोडा घट्ट असतो.

Exit mobile version