। उरण । वार्ताहर ।
उरणमधील डॉ. मंगेश डाकी यांच्या पनवेलमधील प्राचीन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आर्थिक परिस्थिती कमकुवत असणार्या गरीब आदिवासी मुलावर उपचार केले आहेत. त्यांनी अनेक रुग्णांना उपचार करून आजवर दिलासा दिला आहे.पनवेलमधील वाझे गावात कौटुंबिक वादातून हाताला झालेल्या दुखापतीमुळे कातकरी कुटुंबातील आठ वर्षीय राज योगेश कातकरी याला असह्य वेदना होत होत्या. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, उपचार घेता येत नव्हते. याची दखल गावातील साहिल नामक इसमाने घेत सदर प्रकाराची माहिती हॉस्पिटलचे डॉ. मंगेश डाके यांना दिली. डॉ. डाके यांनी तात्काळ राज कातकरी याला आपल्या प्राचीन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बोलावून तपासले असता राज यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे लक्षात आले. डॉक्टर मंगेश डाके यांनी राज कातकरी या आठ वर्षीय रुग्णावर तात्काळ उपचार केले. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता येणार्या उपचार खर्चामध्ये भरघोस सवलत दिली. यामुळे कातकरी कुटुंबाच्या चेहर्यावर हास्य पाहायला मिळाले. त्यांनी डॉ. डाके यांचे आभार मानले.