। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील राणेची वाडी येथील मुलांनी आपल्या शेतकरी वडिलांचे स्मारक उभारून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. राणेची वाडी येथील जगदीश, जयेश आणि भास्कर या तीन भावांनी मिळून आपले वडील कै.नारायण भिकू गोळे यांचे स्मारक उभारले आहे. गोळे हे दानशूर, प्रचंड कष्टाळू व हाडाचे शेतकरी म्हणून परिचित होते.हालाकीचे दिवस असताना देखील अनेक संकटांना तोंड देऊन त्यांनी शेती हा पारंपरिक व्यवसाय जोपासला. माणूस केवळ शिक्षणानेच नाही तर संस्कारानेही मोठा होतो याच संस्काराचा बीज त्यांनी आपल्या तिन्ही मुलांमध्ये रोवला. आजच्या काळात माणूस आपली एक इंच जागा देखील सोडत नाही मात्र गोळे यांनी गावातील पंचमुखी मंदिरासाठी स्वतःची चार गुंठे जागा गावासाठी दान स्वरूपात दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या तीन मुलांपैकी धाकटा मुलगा भास्कर याला आपल्या चुलत भावाला दत्तक म्हणून दिले. यांसह अडचणीत असलेल्या गावातील नागरिकांसाठी ते अर्ध्या रात्रीही धावून जात असत. त्यांची ही दानशूर वृत्ती जनसामान्यांपर्यंत पोहचावी या उदात्त हेतून त्यांच्या तिन्ही मुलांनी मिळून गावात त्यांचे स्मारक उभारले. व या स्मारकाचे उद्घाटन आपली आई शेवंती गोळे यांच्या हस्ते केले. तळा तालुक्यात मुलांनी आपल्या शेतकरी वडिलांचे स्मारक उभारल्याची ही प्रथमच घटना असून गोळे बंधूंच्या आपल्या वाडीलांप्रति असलेल्या प्रेमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.