कर्जत येथील स्पर्धेत जिल्ह्यातील महिला डॉक्टरांचा सहभाग
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत येथील रायगड मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक अधिवेशनात यंदा वैद्यकीय क्षेत्रासोबतच सौंदर्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण ठरली ‘मिसेस आर.एम.ए. सुंदरी 2026′ ही सौंदर्य स्पर्धा. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पनवेलच्या दंतचिकित्सक डॉ. प्राजक्ता पाटील यांनी विजेतेपद पटकावत ‘आर.एम.ए. सुंदरी 2026′ हा बहुमान मिळवला.
कर्जत येथील क्राउन व्हिला येथे पार पडलेल्या या सोहळ्याचे आयोजन रायगड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सांस्कृतिक सचिव डॉ. सुप्रिया घोसाळकर, डॉ. वर्षा मोरे, डॉ. शर्वाणी कुलकर्णी, डॉ. शीतल कराळे, डॉ. जयश्री देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या स्पर्धेचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले होते.
या सौंदर्य स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध भागांतील महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्वाच्या आधारे परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली. स्पर्धेत दुसरा क्रमांक खोपोलीच्या डॉ. पल्लवी डोंबाले यांनी, तिसरा क्रमांक कर्जतच्या डॉ. अमृता पाटील यांनी, चौथा क्रमांक खारघरच्या डॉ. अंजू धार यांनी, तर पाचवा क्रमांक खोपोलीच्या डॉ. रश्मी गांधी यांनी पटकावला.
विजेत्या स्पर्धकांना रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, सचिव डॉ. प्रशांत गांगल, खजिनदार डॉ. कुमार ओसवाल, रायकोनचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष डॉ. गणेश साळुंखे आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. श्रीपाल जैन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मिस महाराष्ट्र पूजा बंदरकर, मिस महाराष्ट्र रनर-अप डॉ. आरती भोजने आणि अभिनेत्री ईशा सूर्यवंशी यांनी काम पाहिले. महिला डॉक्टरांमधील बहुआयामी व्यक्तिमत्त्व, सौंदर्य आणि सामाजिक जाणीव यांचे दर्शन घडवणारी ही स्पर्धा उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
