नगरपंचायत, महामार्ग विभागाचा गैरकारभार उघड
| पोलादपूर | प्रतिनिधी |
गेल्या मंगळवारी पाच मिनिटे झालेल्या पावसात महामार्गावर गेल्याप्रमाणे वीतभर पाणी तुंबल्याने महामार्ग विभाग व नगरपंचायत पोलादपूरच्या पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईचा गैरकारभार उघड झाला. या पावसाने काही तासापुरता हवेत गारवा निर्माण केला तरी प्रशासनाचा गैरकारभार उघड केला.
मंगळवारी पोलादपूर शहरात फक्त वीस मिनिट पाऊस पडला. पण या पावसाने महामार्ग विभागाच्या गलथान कारभारासह पोलादपूर नगरपंचायतीची पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, गटारातून पाणी जाण्यासाठी चर खोदण्याची कामे झाली नसल्याची स्पष्टता पावसाने उघड केली. पोलादपूर शहरातील प्रभातनगर पूर्व पश्चिम विभागाला जोडणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वीतभर पाण्याखाली गेल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर महामार्गावरील साचलेल्या पाण्याचे फवारे उडत होते. महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांचे उडणारे पाणी आणि पावसाला सुरुवात झाली असताना महामार्गावरील साचणारे पाणी पाहता नगरपंचायत पोलादपूरचे प्रशासन आणि महामार्ग विभागामार्फत आगामी चार महिने उपाययोजना होतील अथवा कसे याबाबत नागरिक साशंकता व्यक्त करीत आहेत.
पावसाने गेल्या मंगळवारी हजेरी लावल्यानंतर घेतलेल्या विश्रांती काळात अद्याप संबंधित यंत्रणांना महामार्गावरील साचणारे पाणी पुन्हा साचून वाहनांमुळे फवारे उडू नयेत, याची दक्षता घेण्याची जाग आली नसल्याचे दिसून आले आहे.
