| पालघर | प्रतिनिधी |
वसई पूर्वेतून जाणाऱ्या मुंबई- दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खानिवडे, खराटतारा येथे झालेल्या भीषण अपघातात कंटेनर वाहू मोठा ट्रक कठड्याचा वरचा भाग तोडून थेट कोसळला. तानसा नदी पात्राच्या दोन पुलांमध्ये सुमारे 25 ते 30 फूट खोल खाली कोसळलेल्या ट्रकची केबीन पत्रातील चिखलात रुतली. तर उर्वरित ट्रकचे अनेक भाग चेंदामेंदा झाले. रविवारी (दि.09) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातात चालक ठार झाला असून, त्याचा सहाय्यक गंभीर जखमी झाल्याचे समजले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरसारखी अवजड वाहतूक करणारा हा ट्रक मुंबईकडून गुजरातच्या दिशेकडे भरधाव वेगाने जात होता. याचदरम्यान तानसा नदीच्या पात्रावर असलेल्या सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता अशा दोन पुलांच्या जवळ रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान आला असताना वाहनावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि दोन पुलांच्या मधल्या दरीत तो कोसळला. या दोन पुलांच्या मध्ये कोसळून आतापर्यंत अनेक अपघात घडले असल्याने रस्ते व्यवस्थापनेकडून दोन पुलांच्या सुरुवातीच्या मधल्या भागात सुरक्षा म्हणून सिमेंट काँक्रीटच्या मोठ्या ठोकळ्यांचे अडसर ठेवले आहेत. त्यांच्यावरून सेवा रस्त्याच्या पुलाच्या कठड्याला घासून हा ट्रक खाली कोसळला. अपघाताचा झालेला आवाज ऐकून गावातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान घटनेची मिळताच पोहचलेल्या मांडवी पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले.