किनार्‍यावरील मासळीचा दुष्काळ

पाणथळी, खाडीमुखावरील भराव; कोळींब, कालवे, खुबेची आवक घटली
। उरण । वार्ताहर ।
तालुक्यात विकासकामांच्या नावाखाली येथील पाणथळांची ठिकाणे तसेच समुद्राला जोडलेल्या खाडीमुखांवर मातीचा भराव टाकून ते बुजविले जात आहेत. तसेच समुद्रातील वाढत्या जहाजांच्या वाहतुकीमुळे तेलजन्य पदार्थामुळे जल प्रदूषण होत आहे. त्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्यांना स्थानिक मासळी मिळेनाशी झाली आहे. बाजारात आवकही घटली आहे. प्रामुख्याने चिखल आणि खाडीकिनार्‍यावर आढळणार्‍या चविष्ट सीफूड म्हणून ओळख असलेल्या निवटया, कोळींब, कालवे, खुबे आदी मासळींचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. परिणामी स्थानिक महिला मच्छिमारांच्या रोजगाराचा प्रश्‍न उभा राहिला आहे.
तालुकातील मुख्य व्यवसाय हा भातशेती, मिठागरातून मीठ उत्पादन व खाडीकिनार्‍यावरील स्थानिक मासेमारी हा होता व आहे. मात्र यातील शेती सिडको, जेएनपीटी बंदर तसेच इतर उद्योगांसाठी संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे शेती व्यवसाय बंद झाला आहे. त्याचप्रमाणे मिठागरे संपुष्टात आली आहेत. खाडीकिनार्‍यावर होणारी मासेमारी व्यवसाय काही प्रमाणात शिल्लक होता. या व्यवसायावरही सध्या विविध उद्योग व व्यवसायांसाठी सुरू असलेल्या विकासकामांमुळे मासळीची ठिकाणे असलेल्या पाणथळ जागा तसेच खाडींच्या मुखावर, नैसर्गिक नाल्यांवर मोठया प्रमाणात मातीचा भराव केला जात आहे. त्यामुळे मासळीची नैसर्गिक ठिकाणे नष्ट होत आहेत. त्यात भर म्हणजे बंदरातून येणार्‍या महाकाय जहाजातून समुद्रातून खाडीमार्गे तेलजन्य पदार्थामुळे जल प्रदूषणात वाढ होत आहे. तसेच अनेक ठिकाणी असलेल्या गोदामातून रसायनाची वाहतूक करणार्‍या कंटेनरची सफाई केल्यामुळे यातील रसायने खाडीत सोडली जात आहेत. याचा परिणाम मासळीवर झाला आहे. मात्र या प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तसेच येथील आस्थापनांकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. याचा सर्वाधिक फटका हा स्थानिक मासेमारांना होऊ लागला आहे.

आमच्या सर्वच्या सर्व शेतीच्या जमिनी आणि मिठागरे सिडकोने संपादित केली आहेत. कुटुंबात कोणालाही नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे मासेमारी हाच आमचा व्यवसाय सध्या शिल्लक आहे. या आमच्या व्यवसायावरही सध्या मातीचा भराव व पाण्याचे प्रदूषण होत असल्याने संकट आले आहे. – वत्सला पाटील, स्थानिक मच्छिमार

समुद्र आणि खाडीकिनार्‍यावर हिवाळयात कोळींब, निवटया यांसारखी मासळी तसेच इतर दिवशी कालवे, खुबे हे शिंपला मासळीचे प्रकार याची मासेमारी आम्ही करीत होतो. मात्र या मासळीचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. त्यामुळे त्याचे दरही वाढले आहेत.- सुनील पाटील, स्थानिक मासेमार

Exit mobile version