उरणमध्ये दिवसाढवळ्या चालतो ‘नशेचा बाजार’

| उरण | घनःश्याम कडू |

उरण चारफाटा, शहर आणि तालुक्यातील पान टपऱ्यांवर दिवसाढवळ्या चरस, गांजा आणि गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असून, पोलिसांनी डोळेझाक केल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे. तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणारा हा धंदा एवढ्या उघडपणे सुरू आहे की, उरण लवकरच मादक पदार्थांचे केंद्रबिंदू ठरण्याच्या मार्गावर आहे.

चारफाट्यावर गांजाची विक्री बिनदिक्कत सुरू आहे, तर तालुक्यातील बहुतेक पान टपऱ्यांवर चरस, गांजा आणि गुटखा विक्रीचा उघड व्यवसाय सुरु आहे. परप्रांतीयांनी भाड्याने पान टपऱ्या घेतल्या आणि नशेच्या पैशातून गाळे, सदनिका, अगदी बंगले उभारले. काहींनी तर आठवड्याचा बाजार चालवून लाखोंची माया गोळा केली आहे. यातील सोनू, पटेल, शहा आदी नावे ठळकपणे पुढे आली आहेत. विशेषतः सोनू नावाचा व्यक्ती-भाड्याने पान टपरी चालवून आज कोट्यवधींचा मालक झाला आहे. त्याच्या मालमत्तेची चौकशी केली, तर उरणमधील नशा रॅकेटचा कणा उघड होईल, असा स्थानिकांचा ठाम दावा आहे. उरण आणि द्रोणागिरी नोड परिसरातील युवकांना बरबादीच्या वाटेवर ढकलणाऱ्या या नशेबाजांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा नागरिक स्वतः कारवाईसाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा जनतेकडून दिला जात आहे.

Exit mobile version