साडे नऊ कोटींचा खर्च; मच्छिमारांची गैरसोय
। चिरनेर । वार्ताहर ।
मच्छीमारांच्या बोटी दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटी रुपये खर्च करुन करंजा बंदरात उभारण्यात येत असलेले ड्राय डॉक आठ वर्षापासून अपूर्णावस्थेत पडून आहे. त्यामुळे नौका दुरुस्तीच्या कामासाठी येथील मच्छीमारांची गैरसोय होत आहे.
करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी लँडिंग करण्यासाठी अद्ययावत बंदर उभारण्यात येत आहे. या बंदराची उभारणी करंजा नवापाडा येथील बोटी दुरुस्तीसाठी पूर्वापार वापर करत असलेल्या जागेवर करण्यात आली आहे. त्यामुळे करंजा नवापाडा येथील मच्छीमार बोटी दुरुस्तीसाठी जागा उरली नव्हती. त्यामुळे मच्छीमारांनी बोटी दुरुस्तीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर मत्स्यव्यवसाय विभागाकडून करंजा नवापाडा येथील मच्छिमारांसाठी बोटी दुरुस्तीसाठी 150 कोटी रुपये खर्चाच्या उभारण्यात येत असलेल्या मच्छीमार बंदराच्या शेजारीच 250 मीटर लांबीचा व दोनशे मीटर रुंदीचा अशी पन्नास हजार चौरस मीटर जागा ड्रायडॉकसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मच्छीमार बोटींची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेत सभोवर संरक्षक भिंत उभारणी आणि जागा सरफेस काँक्रिटीकरण करण्याच्या कामासाठी आठ वर्षापूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाकडून सुमारे साडेनऊ कोटीचा निधी मंजूर केला. मात्र मागील आठ वर्षांपासून सुरू असलेले ड्रायडॉकचे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, मच्छीमारांना जाळी सुकवणे, बोट दुरुस्तीसाठी अनेक अडचणी येत आहेत.
अपूर्ण अवस्थेत असलेल्या ड्राय डॉकच्या कामामुळे मच्छीमार बोटींची दुरुस्ती, रंग रंगोटीच्या कामांसाठी मच्छीमारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आठ वर्षानंतर ही रखडत चाललेले काम पूर्ण करण्यासाठी संस्थेकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
– भालचंद्र नाखवा, अध्यक्ष, करंजा मच्छीमार संस्था