। चिरनेर । वार्ताहर ।
सिडकोकडून संपादित न झालेल्या चाणजे करंजा परिसरातील शेतकर्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी भूमाफिया सक्रिय झाले आहेत. शेजारीच जमिनीचा दर आठ ते दहा लाख रुपये गुंठा असताना निम्म्यापेक्षा कमी दराने या जमिनीची खरेदी सुरू आहे. शेतकर्यांनी सावध होत आपली फसवणूक होऊन न देता जमिनीला योग्य दर मिळेपर्यंत जमिनीची विक्री करू नये,असे आवाहन पंचायत समितीच्या सदस्यांनी केले आहे.
करंजा मधील जमिनी या समुद्र किनार्यावर व सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेतून विकसित होणार्या द्रोणागिरी नोडशेजारी आहेत. त्यामुळे या जमिनीचे महत्त्व अधिक वाढले आहे. एका गुंठ्याला आठ ते दहा लाख रुपयांचा दर मिळत आहे. मात्र करंजा येथील जमिनी अविकसित असल्याच्या नावाखाली येथील जमिनीला दोन ते चार लाख रुपये इतका कमी दर दिला जात असल्याची माहिती करंजा येथील शेतकरी विनायक पाटील यांनी दिली. यावेळी शेतकर्यांनी जमिनी राखण्याचे आवाहन पं.स. सदस्य दीपक ठाकूर यांनी केले आहे.