| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता दीर्घकालीन आणि तातडीच्या उपाययोजना राबवण्याची मागणी पुढे आली आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यातील शिलार धरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच नवी मुंबई महानगरपालिकेकडून 30 अतिरिक्त पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून या दोन्ही मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.
शिलार धरण प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून, या प्रकल्पासाठी सुमारे 4800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी सुमारे 3672 कोटी रुपयांचा आर्थिक भार पनवेल महानगरपालिकेवर पडणार असल्याने, एवढा मोठा निधी उभारणे पालिकेसाठी शक्य नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी शासनाने तातडीने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पनवेल शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेकडे त्यांच्या गरजेपेक्षा अधिक पाणी उपलब्ध असल्याने, त्यातील किमान 30 एमएलडी पाणी पनवेलला देण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे.







