गणेशोत्सवामुळे गाव-वाड्यांवर चैतन्य संचारले

। पाली/बेणसे। वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. खेड्यापाड्यांत व वाडीवस्तीवरील बहुसंख्य तरुण मंडळी नोकरी-व्यवसायानिमित्त पुणे-मुंबई आदी शहरांत राहतात. ही मंडळी गणेशोत्सवाला आवर्जून गावी येतात. त्यामुळे इतर दिवशी ओस पडलेली गावे व वाड्यांमध्ये आता चैतन्य आले आहे. स्थानिक बाजारपेठाही सजल्या असून अनेक सार्वजनिक मंडळांकडून विविध प्रबोधनात्मक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चाकरमानी रविवारपासून गावी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे वर्षभर बंद असलेल्या काही घरांचे टाळे आता उघडले आहे. तसेच एकांतात राहणार्‍या वृद्ध मंडळीही मुले-बाळे, नातवंडे व नातेवाईक घरी आल्याने सुखावली आहेत. उत्सवानिमित्त गावागावांत रेलचेल वाढली आहे. गावांना खर्‍या अर्थाने गावपण आले आहे. गावे-वाड्या जणूकाही उजळून निघाल्या आहेत. आर्थिक व्यवहारांना गती आली आहे.

कासारवाडी येथील तरुण कवी उमेश जाधव म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी शहरातून आलेली व येथे असलेले सर्व गावकरी एकत्र येतो आणि गावाची साफसफाई करतो. गावात भजन-कीर्तनाचे कार्यक्रम राबविले जातात. कोरोनाकाळात गावात सॅनिटायझर फवारणी देखील केली होती. सत्यशोधक वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष महेश पोंगडे म्हणाले की, गणपतीमध्ये विविध प्रबोधनाचे कार्यक्रम राबवतो. तसेच दानशूर मंडळींच्या माध्यमातून आदिवासी व गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करतो.

गणरायासमोर विविध स्पर्धा
प्रत्येक जण गणरायाच्या स्वागतासाठी आतुर झाला आहे. जिकडेतिकडे बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यावर घराघरांत आरत्या, भजन-कीर्तनाचे सूर घुमतात. सुधागड तालुक्यातील वावे गावातील तरुण गणरायासमोर व्हॉलीबॉल व इतर स्पर्धा घेतात; तर ग्रंथालयात पुस्तके वाचण्यासाठी तरुण व मुले जमतात. एकमेकांशी विचारविनिमय केल्याने तरुणांच्या हातातील मोबाईल सुटले. अनेक व्यसनांपासून तरुण दूर गेले. गणपतीमध्ये एक नवीन आनंदाची आणि एकात्मतेची ऊर्जा पसरत असल्याचे तरुण केतन म्हस्के याने सांगितले.

मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा
लहान मुलांना पर्यावरणस्नेही व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले तर पुढची पिढी पर्यावरणाप्रती अधिक सजग होईल. या उद्देशाने लहानग्यांसाठी मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली जात असल्याचे मार्गदर्शक नेहा तारकर-देशमुख आणि अभिषेक देशमुख यांनी सांगितले. घरगुती सजावटीच्या माध्यमातून प्लास्टिक विरोधी संदेश, स्त्री-भ्रूणहत्या रोखणे, वृक्षलागवड, बेटी पढाओ आदी संदेश देणारे देखावे साकारून सामाजिक संदशे दिला जातो; तर काही महाराजांच्या गडकिल्ल्यांची प्रतिकृती बनवून गडकिल्ले संवर्धनचा जागर केला जात असल्याचे शिक्षक राजेंद्र अंबिके यांनी सांगितले.

प्रबोधनात्मक कार्यक्रम
जिल्ह्यात काही ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवात चमत्कार, प्रयोग सादरीकरण, सर्पविज्ञान आदी विधायक व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. ज्याला चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही असे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाली शाखा कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांनी सांगितले

Exit mobile version