नाइलाजस्तव खासगी रुग्णालयात उपचार
| खोपोली | वार्ताहर |
रुग्णवाहिका न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या मुलीला नाइलाजस्तव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या मुलीची प्रकृती सुखरूप आहे. मात्र रुग्णवाहीका अभावी झालेल्या या फरफटनंतर खासगी रुग्णालयातील अवाढव्य बिल कसे भरायचे, असा प्रश्न तिच्या पालकांना पडला आहे.
खडई धनगरवाडीतील 14 वर्षांच्या दर्शना औकीरकरला रात्री झोपेत सर्पदंश झाला होता. पहाटे 5 च्या दरम्यान दर्शनाची तब्येत खालावल्याने खडई धनगरवाडा येथून डोलीतून सुधागडच्या परळी येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर तेथून तत्काळ खोपोलीतील खासगी रुग्णालयात हलविण्याची सूचना डॉक्टरांनी दिली. काही सर्पमित्रांनी सूर्यकांडर जातीच्या सापाने दंश केल्याची माहिती दिली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अलिबागच्या शासकीय रुग्णालयात तत्काळ हलविण्यास सांगितले, परंतु खोपोलीत रुग्णवाहीका न मिळाल्याने तसेच अन्य ठिकाणाच्या रुग्णवाहीका जादा पैसे मागत असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची असताना अखेर या मुलीला खासगी रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.
खोपोली शहरात अनेक रुग्णवाहिका आहेत. या सर्व रुग्णवाहिकांचे मालक व चालक रुग्णांची सेवा निस्वार्थपणे करीत आहेत. एखादा अपघात झाला की त्या ठिकाणी अनेक रुग्णवाहिका सेवेसाठी उभ्या असलेल्या दिसून येतात. अपघाताच्या ठिकाणी हे सर्व रुग्णसेवक मोफत सेवा करण्यासाठी जात असतात अशी माहिती आहे, मग त्यातील एखादा रुग्णसेवक कमी पैशात अश्या अडचणीच्या वेळी का सेवा करतांना दिसत नाही. की तो फक्त सेवेच्या नावाखाली मेवा खाण्याचा दिखावा आहे. म्हणूनच का हे रुग्णवाहिका वाले आव्वाच्या सव्वा भाडे मागतात. भाडे मागा परंतु किती मागायचे याचे भान असले पाहिजे. एखादा अडचणीत सापडला आहे म्हणून त्यांची पिळवणूक करू नका. अशा लोकांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे.
किशोर साळुंखे, अध्यक्ष- बहुजन युथ पँथर, खोपोली शहर