तापमानात 28 वरून 41 सेल्सियसपर्यंत वाढ
| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |
गेले पाच दिवस 28 अंश सेल्सियस असणारे मुरुडचे तापमान रविवारी दुपारी अचानक 41 सेल्सियसवर पोहोचल्याने अनेकजण अवाक झाले आहेत. असा प्रकार समतोल वातावरणाच्या दृष्टीनं धोक्याची घंटा वाजवणारा निश्चितच आहे. कारण तापमान 32च्या पुढे जात नाही असा अनुभव आहे. परंतु, रविवारी असा प्रकार निदर्शनास आणि अनुभवायला मिळाला आहे. मुरूडसारखा परिसर समुद्रकिनारी असल्याने हवेत मिठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे घामाचा खूप त्रास होतो.
गेले तीन दिवस पावसाची रिपरिप सुरू होती. कधी मुसळधार तर कधी रिपरिप सुरू राहिल्याने हवेत थंडावा आला होता. हा थंडावा आधिक काळ टिकेल असा असणारा अंदाज रविवारी फोल ठरला आहे. पुढच्या काळात हवामाना बाबत मोठया घातक घडामोडी होण्याची चिन्हे आहेत असे मत बुजुर्ग मंडळीनी व्यक्त केले आहे. बेकायदेशीर जंगलतोड, वृक्षांची कटाई, वाढते प्रदूषण यामुळे वातावरणाचा समतोल बिघडला असून, त्याचा हा परिणाम युवा पिढीला धोकादायक ठरणार याचे संकेत असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत. मुरूड सारख्या समुद्र किनारी भागात एवढे तापमान जाणे हा आगामी काळात धोकादायक सिग्नल म्हणता येईल. रविवारी दुपारी कडक उन पडले होते. सकाळी एक दोन सरी बरसल्या होत्या. सध्या हवामान अंदाजदेखील फोल ठरत असल्याचे दिसत आहे.