नागरिक सर्दी, खोकल्याने त्रस्त
| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग-कुरूळ या प्रमुख रस्त्यावर सध्या धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे अक्षरशः जीवन त्रस्त झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसोबतच सैल माती आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालकांपासून ते पादचारीपर्यंत सर्वांचं जगणं अवघड झाले आहे. दररोज या रस्त्यावरून शेकडो वाहनांची वर्दळ होत असल्याने हवेत उडणाऱ्या धुळीचे प्रमाण इतकं वाढले आहे की सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाचे आजार वाढीस लागले आहेत. लहान मुले, वृद्ध, रुग्ण यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत असून, नागरिक आजारांनी हैराण झाले आहेत.
धुळीमुळे शेजारील घरांमध्ये थरभर धूळ साचत आहे, कपडे, भांडी, अन्नसुद्धा सुरक्षित राहत नाही. नागरिकांना प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र संताप व्यक्त करावा लागत आहे. स्थानिकांनी संबंधित विभागाकडे तातडीने रस्त्यावर पाणी फवारणी आणि डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या गंभीर आरोग्य समस्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, आरोग्य सचिवांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून जनतेच्या आरोग्य व जीवनासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी जनतेची मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून स्वच्छतेच्या दृष्टीनेही हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे. अलिबाग कुरूळ रस्ता तातडीने दुरुस्त करून जनतेला दिलासा देणे हीच काळाची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.







