। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मधमाशा पालन हा शेतीला पूरक व आर्थिक उप्तन्न देणारा एक चांगला व्यवसाय आहे. यातून महिला, बेरोजगार तरुण व शेतकर्यांना गावातल्या गावात रोजगार उपलब्ध होणार आहे. आपण याचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाचा पर्यायाने आपल्या गावाचा आर्थिक विकास साधावा, असे आवाहन तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी यांनी केले आहे.
मधमाशा पालन व्यवसायबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी, यातून मधमाशा पालन व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने एका पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
खादी ग्रामोद्योग, ग्रामपंचायत तळवडे व पितांबारी समूहाने या पदयात्रेचे आयोजन केले होते. पितांबरी कंपनी ते तळवडे-पाचल अर्जुना नदी पुलादरम्यान काढण्यात आलेल्या पदयात्रेला ग्रामस्थ, महिला युवक व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव तयार केले जात आहे. त्यानूसार राजापुर तालुक्यातील तळवडे गावाची मधाचे गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. तळवडे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत तसा ठरावदेखील मंजूर केला आहे. मधाचे गाव जाहीर झालेल्या गावांना खादी ग्राममोद्योगामार्फत 54 लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे. तळवडे मधाचे गाव म्हणून प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आता लवकरच मधाचे गाव तयार करण्यासाठी मधमाशांच संर्वधन करण्यासाठी युवक आणि महिलांना शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
त्यानंतर ग्रामस्थांना मधमाशा संर्वधनासाठी पेट्या व अन्य साहित्य देण्यात येणार आहे. यावेळी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी, पितांबरी समुहाचे अदित्य मुळ्यो, पत्रकार सुरेश गुडेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, पितांबरी समूहाचे सुहास प्रभुदेसाई, तळवडे शाळा नं. 1 व 2 चे मुख्याध्यापक सौ. कुळकर्णी, अनाजी मासये, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.