सेंट जोसेफ स्कूलला शिक्षण विभागाचा दणका

शाळेची चौकशी सुरू, मुख्याध्यापिका बडतर्फ

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत शहरातील पाच वर्षीय तीन मुलींच्या लैंगिक छळवणूक प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनतर राज्य सरकारचे शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी खालापूर तालुक्यातील लोधीवली येथील सेंट जोसेफ शाळेची चौकशी सुरू केली आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिसिलिया यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, या आधी लहान मुलींची लैंगिक छळवणूक करणारा तरुण अटकेत असून, ज्या स्कूल बसमध्ये हा प्रकार वर्षभर सुरू होता, ती स्कूल बसदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

सेंट जोसेफ कॉन्व्हेट स्कुल, लोधीवली येथे शिकणार्‍या तीन चिमुरड्या मुलींवर शाळेच्या बसमध्ये 24 वर्षीय तरुण करण दीपक पाटील (बस कर्मचारी) याने लैंगिक अत्याचार केले होते. गेली वर्षभर अत्याचार होत असताना त्या तीन मुलींनी आपल्या पालकांना ही माहिती दिल्यानंतर 16 एप्रिल रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आरोपी तरुणावर कठोर कारवाई व्हावी, शाळेची मान्यता रद्द व्हावी, या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावा आणि मुख्याध्यापिका यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यात स्कुल बस ही सेंट जोसेफ कॉन्व्हेट स्कुलची असल्यामुळे या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही या शाळेच्या मुख्य पदावर बसणार्‍या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनांची आहे. त्यामुळे या प्रकारास स्कूल बसमधील कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन आणि संस्था जबाबदार असल्याने त्या सर्व दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, घटनेनंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती.

शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आक्रमक भूमिका घेणार असल्याचे पत्र शिक्षण अधिकारी यांना 21 एप्रिल रोजी दिले. त्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उपशिक्षण अधिकारी सुनीता चांदोरकर, खालापूर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमाले आणि शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे यांची चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल जिल्हा शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांना सादर केला. त्या अहवालात प्रथम दर्शनी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिसिलिया या जबाबदार असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिसिलिया यांच्यावर महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली 1981नुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याचवेळी शाळेची चौकशी सुरू करण्यात आल्याचे पत्र जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडून सेंट जोसेफ स्कूलच्या अध्यक्ष आणि सचिव यांना देण्यात आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थी संघटना जिल्हा अध्यक्ष प्रसन्न बनसोडे आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. शाळेची स्कूल बस कर्जत पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आल्याने यापूर्वी ताब्यात घेतली आहे. तर तीन लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारा तरुण करण शिवाजी पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी त्याला अटक झाली आहे.

Exit mobile version