महामार्गाच्या पुर्ततेसाठी प्रयत्नशील- खा. सुनील तटकरे

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण जानेवारीपासून सुरु होईल अशी अपेक्षा खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँक्रिटीकरणासाठी मंजूर केलेले 250 कोटी मिळण्यासाठी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत असे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.अलिबाग मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होत आहे. तर किनारपट्टीवरील बंदरांची उभाराणी आणि पर्यटन दृष्टीने त्यांचा विकास करणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दिवेआगार येथील सुवर्ण गणेशमूर्तीसाठी आपण जिल्हा आणि उच्च न्यायालया पर्यंत पाठपुरावा करुन सोन्याची गणेशमूर्ती बनविण्याची परवानगी मिळाली असून येत्या 23 नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते सुवर्ण गणेशमूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करणार आहोत. यामुळे जिल्ह्यात तिर्थक्षेत्र पर्यटन वाढण्यास मदत होईल असे खा. तटकरे म्हणाले.राज्याचे संग्रहालय जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये व्हावे यासाठी पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्यासह आपणही पाठपुरवा करीत आहोत. पोयनाड-नागोठणे, पाली ते रवाळजे, इंदापूर ते पाचाड हे चार रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण होतील. जिल्ह्याच्या ठिकाणी आलिबाग येथे पासपोर्ट कार्यालयासाठी जागेची पाहणी करण्यासाठी पासपोर्ट विभागातील अधिकारी दौरा करुन पहाणी करणार आहेत.

येत्या जानेवारी पर्यंत पासपोर्ट कार्यालय अलिबाग येथे सुरू होईल अशी अपेक्षा आहे. थळ आरसीएफ कंपनीच्या रेल्वे मार्गावर प्रवासी रेल्वे सुरू करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून बैठक घेतली जाईल. जिल्ह्यात रेल्वे क्राँसिंगमुळे वाहतूक कोंडी होते तेथे पूल उभारणीसाठी आपले शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. केंद्रशासनाच्या अखत्यारित येणारे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असेही खा. सुनील तटकरे म्हणाले. या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे, जिल्हा सरचिटणीस मानसी चेऊलकर, आदी उपस्थित होते.

Exit mobile version