| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पोशिर गावातील 200 हून अधिक घरे गेली नऊ दिवस अंधारात आहेत. येथील वीज रोहित्र बंद पडल्याने वीज पुरवठा बंद झाला असून, 29 एप्रिल रोजी सायंकाळी नवीन वीज रोहित्र बसवण्यात आले. दरम्यान वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर रात्री वीज ग्राहक झोपेत असताना वीज रोहित्र पुन्हा बंद पडले आणि वीज ग्राहकांची झोपमोड झाली.
नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील पोशिर गावात 700-800 घरे आहेत, त्यामुळे गावातील वेगवेगळ्या भागाचे तीन भागात विभाजन करण्यात आले आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज रोहित्र बसवण्यात आले असून, त्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो. गावातील 200 हून अधिक घरांचा वीज पुरवठा असलेले एक वीज रोहित्र 22 एप्रिल रोजी बंद पडले. त्यानंतर ग्रामस्थांनी वीज रोहित्र नवीन मिळावे यासाठी कळंब येथील महावितरणचे सहायक अभियंता यांचे कार्यालय तसेच कर्जत येथील उप अभियंता कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. शेवटी ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आणि वीज रोहित्र पोशिर गावात पोहचले. पण ते वीज रोहित्र आधीच कमकुवत असल्याने ते वीज रोहित्र असलेल्या ठिकाणी बसवता आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
अखेर 29 एप्रिल रोजी पनवेल येथून नवीन वीज रोहित्र आणले गेले. सायंकाळी पोशीर गावात पोहचलेले वीज रोहित्र रात्री उशिरा पर्यंत खांबावर चढवण्यात आले. शेवटी रात्री उशिरा गावातील त्या 200 हून अधिक घरामध्ये आठ दिवसांनी वीज पुरवठा पूर्ववत झाला. मात्र, ग्रामस्थांची गैरसोय दूर होण्याचे नाव घेत नव्हती आणि रात्री ग्रामस्थ गाढ झोपेत असताना ते नवीन वीज रोहित्र पुन्हा बंद पडले आणि रात्री सर्वांची झोपमोड होऊन सर्वत्र अंधार पाहून ग्रामस्थांचा संताप सुरू झाला. 30 एप्रिल रोजी ग्रामस्थांनी उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांच्याशी संपर्क केला असता कळंब येथील सहायक अभियंता कुमरे यांनी आपल्यालावीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे. मात्र, ग्रामस्थ आणि माजी सभापती धोंडू राणे यांनी गावात असलेली अनेक शुभ कार्ये लक्षात घेऊन वीज रोहित्र नव्याने आणून बसवावे अशी मागणी केली आहे. महावितरण कडून उपअभियंता केंद्रे यांनी आजच नवीन वीज रोहित्र आणून देण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नऊ दिवसांनी पोशिर गावातील वीज ग्राहकांचे मागे लागलेले शुक्लकाष्ठ दूर होईल काय? असा प्रश्न कायम आहे.







