नद्या धोक्याच्या पातळीवर; सोमवारी रेड अलर्ट
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून संततधार कायम आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढला असून सावित्री, अंबा, कुंडलिका, उल्हास, गाढी आणि पाताळगंगा या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अलिबागसह सहा तालुक्यांमध्ये आठ घरांचे आणि एका गोठ्याचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
माणगाव तालुक्यात सर्वाधिक चार घरांची पडझड झाली. तळा तालुक्यातील चरई खुर्द आदिवासीवाडी येथील अंकुश हिलम यांच्या घराचे नुकसान झाले. महाड तालुक्यातील ताम्हाणे येथे अशोक पवार यांच्या घरावर झाडाची फांदी कोसळून घराचे नुकसान झाले. रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे भाग्या पवार यांचे घर कोसळले, तर खालापूर तालुक्यातील कारगाव येथे फुलबाई मुसळे यांच्या गुरांच्या गोठ्यावर झाड कोसळल्याने गोठ्याचे मोठे नुकसान झाले. अलिबाग तालुक्यातही एका घराचे नुकसान झाले आहे. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत 784 मिमी पावसाची नोंद झाली असून, हा सरासरीच्या 96.6 टक्के आहे. शनिवारी (4 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 103.8 मिमी पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदी, रोहा येथील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, पूरस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान, हेटवणे मध्यम प्रकल्पात 32.80 टक्के जलसाठा झाला असून जिल्ह्यातील 28 लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असला तरी वाहतूक सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाने रविवार (5 जुलै) आणि मंगळवार (7 जुलै) या दिवशी ऑरेंज अलर्ट, सोमवार (6 जुलै) रोजी रेड अलर्ट, तर बुधवार (8 जुलै) रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले, धबधबे आणि सखल भागांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







