एकदरा पूल वाहतुकीस धोकादायक

सिमेंटचे संरक्षक कठडे मोडकळीस

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुडला जोडणार्‍या एकदरा पुलाला 80 वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली असून, वाढत्या रहदारीचा भार सोसणार्‍या व अत्यंत महत्त्वाचा असलेला पूल दुरुस्तीअभावी धोकादायक बनत आहे. या पुलावरील असलेल्या कठड्यांचे सिमेंट पडून शिगा बाहेर दिसत आहेत. परिणामी, या पुलाबाबत दिवसेंदिवस नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ लागली आहे.


मुरुड पर्यटनस्थळ असल्यामुळे जंजिरा किल्ला पाहण्यासाठी याच पुलावरुन हजारो पर्यटकांसह सामान्य नागरिक या पुलावरून आपल्या गाड्यांसह प्रवास करत असतात. वाहनांच्या वर्दळीमुळे पुलाला हादरे बसतात. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पुलावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हा पूल अतिशय धोकादायक बनला आहे. वाहने पेलण्याची क्षमता शिल्लक राहिली नसल्याने या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, नाहीतर महाड येथील सावित्री नदीवरील जी दुर्दैवी दुर्घटना घडली होती, त्या पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित या पुलावरील ही काम सुरू करावे व नवा पूल लवकरात लवकर उभारावा, अशी मागणी नागरिकांकडून करीत आहेत.

Exit mobile version