। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाण्यात महापालिकेच्या घंटागाडीने एका वृद्ध व्यक्तीला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घंटागाडी चालक पाठिमागे (रिव्हर्स) चालवित नेत असताना हा अपघात झाल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात केली आहे.
सिताराम थोटम (74) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते संतोष नगर येथील चाळ क्रमांक दोन परिसरात राहतात. शुक्रवारी (दि. 24) सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांच्या परिसरातील कचरा वाहून नेण्यासाठी ठाणे महापालिकेची घंटागाडी आली होती. चालक घंटागाडी पाठिमागे नेत होता. त्याचवेळी थोटम हे त्या गाडीच्या मागे होते. त्यांना घंटागाडी मागे येत असल्याचे दिसले नाही. त्यामुळे ते घंटागाडी खाली आले. या अपघातात ते गाडीसोबत काही मीटर अंतरापर्यंत फरफटत गेले आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.