। मुंबई । प्रतिनिधी ।
मालाड येथील एस. व्ही. मार्गावरील कबाडीवाडी येथे सोमवारी (दि. 05) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. किरकोळ भांडणातून 72 वर्षांच्या वृद्धेची शेजारी राहणार्या 62 वर्षांच्या इसमाने चाकूचे वार करून हत्या केली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
रंजना संघवानी (72) या मालाडच्या एस. व्ही. मार्गावरील कबाडीवाडी येथील वासंती भुवन बंगल्यात वास्तव्यास होत्या. त्यांच्या शेजारी असलेल्या बंगल्यात आरोपी अशोक केसवानी (62) हे एकटेच राहतात. दोघांचे बंगले लागून असल्याने संघवानी आणि केसवानी यांच्यात किरकोळ गोष्टींवरून वाद व्हायचे. रंजना संघवानी यांनी सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास आपल्या बंगल्याच्या बाहेर काही समान ठेवले होते. त्याला अशोक केशवानी यांनी आक्षेप घेतला आणि सामान काढण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी संतप्त झालेल्या केसवानी यांनी चाकूने रंजना संघवानी यांच्यावर पाच ते सहा वार केले. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रंजना संघवानी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालाड पोलिसांनी केसवानी यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.