| पोलादपूर | प्रतिनिधी |
येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक आवारात एका वयोवृध्द प्रवासी महिला गावी जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरटयाने महिलेची पर्स लंपास केली. यानंतर चोरटयाने पलायन केले असून या घटनेनंतर पोलादपूर पोलीसांनी एस.टी.स्थानकामध्ये महिला व पुरूष पोलीस कॉन्टेबल्स तैनात करून बंदोबस्त वाढविला आहे.
सदरची घटना शुक्रवारी 7 जूनरोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. चोरांकडून महिला प्रवाशांना लक्ष्य करण्यासाठी एस.टी. बसस्थानकामध्ये चोर्या केल्या जात असून पोलादपूर स्थानकातील गेल्या महिनाभरातील ही दुसरी चोरीची घटना असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत 7 जून 2024 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलादपूर एस.टी. बस स्टँड परिसरात महिला फिर्यादी पोलादपूर ते साखर खडकवाडी असा प्रवास करण्यासाठी एस.टी. बसमध्ये चढत असताना गर्दीतून त्यांच्या पर्समधून दोन पॉकेटमध्ये असलेले 26 हजार रूपये व इतर कागदपत्र व आधारकार्ड कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे वृध्दापकाळाचा फायदा घेवून चोरली. यानंतर चोराने पोबारा केला. एसटी बस स्थानकात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. पोलादपूर शहरातील खासगी बस थांबण्याच्या ठिकाणी महिला प्रवाशांची संख्या कमी असल्याने त्याठिकाणी चोरटयांकडून कोणत्याही प्रकारच्या चोरीचे प्रकार घडताना दिसत नाहीत. याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्नील कदम करीत आहेत.
एसटी स्थानकात वृध्द महिलेच्या पर्सची चोरी

Studio shot of an elderly woman having her handbag stolen by a thief against a gray background