मुख्य पक्षांच्या आघाड्या अनिश्चित
| माथेरान | वार्ताहर |
राज्यातील बहुतांश नगरपालिका निवडणुका आत्ता पुढील वर्षातच होण्याच्या मार्गावर असल्या तरीसुद्धा माथेरानमध्ये केवळ नगराध्यक्षपदाचे आरक्षण बाकी राहिले असल्यामुळे इथले मुख्य पक्ष समजले जाणारे काँग्रेस, शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने अद्यापही आघाडी करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही महिन्यांपूर्वी शिवराष्ट्र पॅनल बनवून आगामी निवडणुकीसाठी तयारी दर्शवली आहे.
माथेरानच्या राजकारणात मुख्य पद हे नगराध्यक्ष असल्याने याच पदांवर सर्वांची भिस्त अवलंबून असते. सर्वकाही देवाण-घेवाण असो किंवा निविदेच्या कामातून जी काही प्राप्ती होते ते या पदावर अधोरेखित असते. त्यामुळेच येथील प्रमुख पक्ष समजले जाणारे काँग्रेस, शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने अद्यापही आघाडी करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवराष्ट्र पॅनेलला शह देण्यासाठी या तीनही पक्षांची आघाडी झाली नाही आणि केवळ नगराध्यक्ष पद आपल्या पारड्यात पडणार नसेल तर कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने नाईलाजाने स्वबळावर या तीनही पक्षांना निवडणुकीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातूनच मतांची विभागणी होऊन शिवराष्ट्र पॅनेलला काहीअंशी याचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जर हा नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटत नसेल तर तीनही पक्षाच्या वरिष्ठांना कुणाच्या पाठीमागे किती राजकीय ताकद आहे याची शहानिशा करण्यासाठी गुप्तपणे माहिती घेऊन जो नगराध्यक्ष पदासाठी कार्यक्षम उमेदवार आहे त्याला पाठिंबा देत आघाडी करणे आवश्यक बनले आहे. अन्यथा ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपसातच या महत्वपूर्ण पदासाठी रस्सीखेच सुरू होऊन, आपल्याला हे पद मिळत नाही म्हणून विरोधी पक्षांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी क्रॉस वोटिंगसुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.