20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील दोन बलाढ्य पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगानं मूळ पक्ष कोणाचे हा निर्णय दिला असला तरी जनतेच्या मनात काय आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक यंदा अनेकार्थांनी वेगळी ठरणार आहे.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाची मंगळवारी (दि. 15) पत्रकार परिषद राजधानी दिल्लीत झाली. त्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुकीची घोषणा होताक्षणी आचारसंहिता लागू झाली आहे. खरं तर, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हरियाणासोबत होणं अपेक्षित होतं. मात्र, जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचं व सण-उत्सवांचं कारण देत निवडणूक आयोगानं महाराष्ट्राची निवडणूक हरियाणासोबत घेणं टाळलं होतं.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टक्कर
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक यावेळी अनेकार्थांनी वेगळी आहे. यावेळी प्रथमच सहा प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. त्यात भाजप, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे छोटे पक्षही आपली ताकद दाखवणार आहेत.
महाराष्ट्राकडं देशाचं लक्ष
राज्यातील फाटाफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेसच्या महाविकास आघाडीनं महायुतीला पराभवाचा दणका दिला होता. 48 पैकी एकूण 31 जागा मविआनं जिंकल्या होत्या. तर, महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं. हीच कामगिरी महाविकास आघाडी विधानसभेत करून दाखवणार की महायुती त्यांना रोखणार याविषयी उत्सुकता आहे.
प्रचाराचे मुख्य मुद्दे
राज्यातील कायदा-सुव्यवस्था, राज्यातून बाहेर चाललेले उद्योग, बेरोजगारी, भ्रष्टाचार, सरकारी पैशाची उधळपट्टी हे मुद्दे महाविकास आघाडीकडून प्रामुख्यानं प्रचारात आणले जातील. तर, महिला व तरुणांसाठी राबवल्या जाणार्या योजना, टोलमाफी आणि पायाभूत सुविधांचा विकास हे यावर महायुतीकडून भर दिला जाईल असं दिसतं. पक्षातील फोडाफोडी हा मुद्दा जुना असला तरी तो नव्यानं चर्चेत येण्याची चिन्हं आहेत.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
महाराष्ट्रातील निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जारी होईल. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज माघारीसाठी 4 नोव्हेंबर ही अखेरची तारीख असेल. तर 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
महाराष्ट्रात किती मतदार?
एकूण 9.63 कोटी मतदार
महिला मतदार - 4.66 कोटी
पुरुष मतदार - 4.97 कोटी
युवा मतदार - 1.85 कोटी
नव मतदार - 20.93 लाख
मतदान केंद्र
1 लाख 183 मतदान केंद्र
शहरी मतदान केंद्र - 42, 604
ग्रामीण मतदान केंद्र - 57,582
महिला अधिकार्यांची मतदान केंद्र - 388
नव अधिकार्यांची मतदान केंद्र - 299
प्रचार तोफा कधी थंडावणार?
निवडणुका या येत्या महिना भरात पार पडणार असल्याने राजकीय पक्षांकडे प्रचारासाठी खूप वेळ शिल्लक आहे. 18 नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावतील.
झारखंडमध्ये दोन टप्प्यात
झारखंडमध्ये 24 जिल्हे असून, एकूण 81 जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहे. यातील 28 जागा या एसटी प्रवर्ग आणि 9 जागा या एससी प्रवर्गासाठी राखीव असतील. झारखंड विधानसभेचा कार्यकाल 5 जानेवारी रोजी संपणार आहे. या राज्यात 2.6 कोटी मतदार आहेत. यात 1.29 कोटी महिला तर 1.31 कोटी पुरुष मतदार आहेत. झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.