दासगावमध्ये वीज कोसळली

। महाड । प्रतिनिधी ।
दासगाव मोहल्यामध्ये रिमझिम पाऊस पडत असताना बुधवारी (दि.31) 8 वाजण्याच्या सुमारास मोठा धमाका झाला. सोबत काही सेकंद संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला. मोहल्ला वस्तीत अचानक वीज कोसळली मात्र जीवितहानी झाली नसली तरी एका घरातून आगीचा गोळा एक बाजूने शिरून दुसर्‍या बाजूने बाहेर पडला आणि नारळाच्या झाडाला जाळून टाकले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ज्या घरामध्ये आगीचा गोळा शिरला त्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू जळून गेल्या. घटनेच्या वेळी त्या घरामध्ये तीन लहान मुले आणि त्यांची आई असे चार लोकांचे कुटुंब वास्तव्य करत होते. घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version