रायगडसह भांडूप परिमंडळात 18.48 कोटींची चोरी
पेण मंडळात 2 कोटी 06 लाखांची चोरी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
वीजचोरांवर महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्यासह भांडूप परिमंडळात 18.48 कोटींची 5 हजार 670 वीजचोरींची प्रकरणे उघडकीस आली असून, यात रायगड जिल्ह्यातील पेण मंडळ कार्यालयात 686 प्रकरणांत 2 कोटी 06 लाखांची वीजचोरी उघडकीस आली आहे.
महावितरणची थकबाकी वाढत असून, वीजबिल वसुलीवर विशेष लक्ष देणे सर्व परिमंडळांना भागच आहे. पण, विजेचा अनधिकृत वापर रोखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भांडूप परिमंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी वीजबिल वसुलीवर भर देत आहेत. याशिवाय, वीज जोडणी तपासणी, 0-30 रीडिंग नोंदवत असलेल्या मीटरची तपासणी असे विविध उपक्रम सतत सुरु असतात. या तपासणीमध्ये भांडूप परिमंडळात 1 एप्रिल 2022 ते 15 जानेवारी 2023 पर्यंत विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 व कलम 135 तसेच आकडा टाकून असे एकूण 18 कोटी 48 लाखांची वीजचोरीची 5670 प्रकरणे उघडकीस आली आहेत.
याशिवाय, विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 नुसार ठाणे मंडळ कार्यालयात 1701 प्रकरणांत 4 कोटी 11 लाख, वाशी मंडळ कार्यालयात 646 प्रकरणात 2 कोटी 32 लाख तर पेण मंडळ कार्यालयात 261 प्रकरणात 73.48 लाख असे एकूण 2608 प्रकरणांत 7 कोटी 18 लाखांचा अनधिकृत विजेचा वापर आढळून आला आहे. याशिवाय आकडा टाकून वीजचोरी करण्याची 647 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 1 कोटी 42 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. सदर मोहिमेत मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अति. कार्यकारी अभियंता, सहा. अभियंता व लाईनस्टाफपर्यंत प्रत्येकाने विशेष मेहनत घेतली आहे.
वर्षभरातील वीजचोरी
भांडूप परिमंडळात 1 एप्रिल 2022 ते 15 जानेवारी 2023 पर्यंत 50 लाख 19 हजार 942 युनिटची 9 कोटी 88 लाखांची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये ठाणे मंडळ कार्यालयांतर्गत 654 प्रकरणात 3 कोटी 24 लाख, वाशी मंडळ कार्यालयात 1,075 प्रकरणात 4 कोटी 57 लाख व पेण मंडळ कार्यालयात 686 प्रकरणात 2 कोटी 06 लाखांची वीजचोरी पकडली आहे.
महावितरणने वीजचोरांवर कठोर कारवाई सुरु केली असून, ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिट विजेचे पैसे प्रामाणिकपणे भरले पाहिजे. वीजचोरी करणार्या ग्राहकांना दंड व कठोर शिक्षा होऊ शकते. ग्राहकांनी वीजचोरीसारख्या कृत्यापासून दूर राहावे.
सुनील काकडे, मुख्य अभियंता, भांडूप परिमंडळ