प्रकल्पग्रस्त आझाद मैदानात धडकणार
| नागोठणे | वार्ताहर |
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन प्रणित, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजमधील प्रकल्पग्रस्त बुधवारी (दि.11) मुंबई येथील आझाद मैदानात धडकणार आहेत. यावेळी सर्व प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागोठणे येथील रिलायन्स कंपनी प्रकल्पबाधीत प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरी संदर्भात बैठक लावण्यात चाल ढकल होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीचा गांभीर्याने व तत्काळ विचार करावा, यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर व ॲड. संदेश मोरे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या मांडण्याचा व बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजता मुंबई येथील आझाद मैदानात प्रकल्पग्रस्त धडकणार आहेत.
आपल्या न्याय हक्कासाठी सर्व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांनी तसेच प्राधान्य प्रमाणपत्र धारकांनी आझाद मैदानात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हजर राहणाऱ्या व्यक्तींची दोन वेळा हजेरी घेतली जाईल. जो हजर राहील त्याचाच विचार केला जाईल, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आझाद मैदानातील या आंदोलनासाठी ‘एक तर आम्हाला रिलायन्स नागोठणे कंपनीत कायमस्वरुपी नोकऱ्या द्या, नाही तर आमच्या जमिनी परत करा’ आणि ‘प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो’ या दोन घोषणा देण्याचे ठरविण्यात आले आहे. या उपोषणासंदर्भात महाराष्ट्र राज्य युनियनचे सरचिटणीस सुरेश मोहिते, सचिव राकेश जवके, उपाध्यक्ष रोशन जांबेकर, संपर्क प्रमुख रायगड रूपा भोईर, अध्यक्ष गंगाराम मिनमिने आदी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मेहनत घेत आहेत.