| सुधागड-पाली | वार्ताहर |
वाकण-पाली राज्य महामार्गावर अंबा नदीवरील पुलाजवळ गुरुवारी (दि.5) मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन, इंजेक्शन सुई, सलाईन व इतर वैद्यकीय कचरा आढळून आला आहे. ही घटना समोर येताच येथील शेतकरी व स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस येथील रस्त्यावर अशाच प्रकारे वैद्यकीय कचरा कोणीतरी टाकला होता. त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
पावसामुळे गटार व नाल्यातून हा वैद्यकीय कचरा वाहत येऊन अंबा नदी पुलाजवळ नाल्यात व शेतात साठून राहतो. या परिसरातून वाहने, प्रवासी, नागरिक व गुरेढोरे ये-जा करत असतात. परिणामी या कचऱ्यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याचा तसेच इंजेक्शन सुई व काचेच्या बाटल्या पायात घुसून जखमी होण्याचा धोका वाढला आहे. पावसामुळे हे दूषित पदार्थ नदी पाण्यात मिसळून जलप्रदूषण होत आहे. शेतकऱ्याच्या प्रसंगावधानते नंतर पाली नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांनी हा सर्व कचरा तेथून हटवला आहे. मात्र, वारंवार असे प्रकार घडत असल्यामुळे स्थानिक संताप व्यक्त करत आहेत.
पावसामुळे नदीचे पाणी वाढून हा घातक वैद्यकीय कचरा शेतात येईल. सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतामध्ये काम करावे लागते. अशावेळी हे घातक इंजेक्शन व काचेचे तुकडे हातापायात गेल्यास मोठी इजा होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच नदीचे पाणी देखील दूषित होत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
तुषार ठोंबरे,
शेतकरी, पाली