चारसूत्री भात लागवडीवर भर

| रायगड | प्रतिनिधी |

आठवडाभर झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील भात लावणी सुरू झाली आहे. त्यामध्ये चारसूत्री भात लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे.पारंपरिक भात लागवडीपासून शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन मिळत नाही, अशी ओरड कायमच आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या पुढाकाराने चारसूत्री लागवड पद्धत सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी गावागावात जाऊन चारसूत्री भात लागवड पद्धतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

800 हून अधिक हेक्टरवर चारसूत्री लागवड
पारंपरिक भात लावणीपेक्षा शेतकऱ्यांनी चारसूत्री भात लागवडीचे फायदे होत आहेत. या पद्धतीत कमी रोप लागते, शिवाय खर्चही कमी येतो. मजूरवर्ग कमी लागतो आणि उत्पादन अधिक मिळते. त्यामुळे कृषी विभागाने जनजागृती केली आहे. कृषी सहायकांच्या मदतीने या पद्धतीने लागवड करण्यास शेतकर्य़ांना प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 800 हून अधिक हेक्टरवर चारसूत्री पद्धतीने लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.या लागवडीतून मजुरीच्या खर्चाची बचत होण्याबरोबर वेळही वाचला जात आहे. त्यामुळे ही पद्धत चांगली आहे, असा विश्वास आहे. चारसूत्री लागवड करताना स्वतः कृषी विभागाचे अधिकारी शेतावर असतात, असं प्रगतशील शेतकरी प्रदीप गुरव म्हणाले.
Exit mobile version