घारापुरी बेटावर जाणार्‍या भक्तांच्या सुरक्षेवर भर

शिवभक्त, पर्यटकांसाठी एक हजार लाईफ जॅकेट

| चिरनेर | प्रतिनिधी |

घारापुरी येथील महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने येणार्‍या शिवभक्त भाविक, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उरण तहसीलदारांच्या मागणीनंतर ओएनजीसीने सीएसआर फंडातून एक हजार लाईफ जॅकेट देण्यात आले आहेत.

घारापुरी बेटावर महाशिवरात्रीनिमित्ताने दरवर्षी हजारो शिवभक्त, पर्यटक हजेरी लावतात. यामध्ये देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्तांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. शिवदर्शनासाठी येणार्या विदेशी पर्यटकांमुळे बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्र म्हणूनही ओळखली जाते. महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर जाण्या-येण्यासाठी बंदर विभागाच्या देखरेखीखाली गेटवे ऑफ इंडिया, जेएनपीए, उरण-मोरा, न्हावा बंदरातून होड्या, लॉचेस, मचव्यांची सोय असते.

मात्र, गेटवे ऑफ इंडिया एलिफंटादरम्यान 18 डिसेंबर रोजी निलकमल बोटीला झालेल्या अपघातात दुदैवी 15 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्ताने घारापुरी बेटावर ये-जा करणार्‍या शिवभक्त व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रत्येक बोटीत लाईफ जॅकेटची व्यवस्था करण्यासाठी उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी पुढाकार घेतला आहे. तहसीलदारांनी लाईफ जॅकेटसाठी उरण ओएनजीसी प्रकल्प अधिकार्‍यांना पत्र पाठवून मागणी केली होती. तहसीलदारांच्या मागणीची दखल घेत ओएनजीसी प्रशासनाने सीएसआर फंडातून एक हजार लाईफ जॅकेट उपविभागीय अधिकारी पवन चांडक व तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केले आहेत. सागरीमार्गे बेटावर ये-जा करणार्‍या शिवभक्त व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट बंदर विभागाच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती उरण तहसीलदारांनी दिली.

दरम्यान, घारापुरी बेटावर महाशिवरात्रीनिमित्ताने ये-जा करणार्‍या शिवभक्त व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रश्‍नावर शनिवारी (दि. 22) तातडीने बैठक बोलावण्यात आली होती. घारापुरी बेटावर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे, बंदर विभागाचे अधिकारी मोहन करंगुडे, एलिफंटा गेटवे जलवाहतूक संस्थेचे पदाधिकारी, पुरातन विभागाचे अधिकारी, घारापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर, सदस्य, ग्रामस्थ, बोट मालक, घारापुरी येथील व्यवसायिक प्रतिनिधी सचिन म्हात्रे, संतोष कोळी, सिक्युरिटी प्रतिनिधी, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत मोरा-घारापुरी (राजबंदर) सागरी मार्गावरील प्रवासादरम्यान शिवभक्त पर्यटकांच्या लुबाडणुकीला आळा घालण्यासाठी एकेरी 65 रुपये तिकीट आकारणी करण्यात आली आहे. प्रत्येक बोटीत 150 क्षमतेपेक्षा प्रवासी वाहतूक केली जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे. भाविकांनी गर्दी करू नये म्हणून नागरी सुरक्षा दल, पोलीस विभाग, बंदर विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आदी कार्यरत असलेल्या सर्वानी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. बोटीतून सागरी प्रवास करताना भाविकांनी लाईफ जॅकेट वापरणे बंधनकारक आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक पर्यटकांची वाहतूक करणार्‍या लाँच मालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

Exit mobile version